मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’
By admin | Published: May 27, 2017 12:22 AM2017-05-27T00:22:51+5:302017-05-27T00:23:00+5:30
नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये येत्या रविवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली असून, रंगरंगोटीसह सभागृह दुरुस्तीवर भर दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांना रेड कार्पेट अंथरून त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपासह प्रशासन उत्सुक आहे.
येत्या रविवारी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येत आहेत. भगूर, नाशिकरोड येथील नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री नाशिक महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीला हजर राहणार आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस पाऊल ठेवणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी स्थायी समितीच्या सभागृहाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभागृहाकडे जाणाऱ्या मार्गाची साफसफाई करण्याबरोबरच रंगरंगोटी केली जात आहे.
याशिवाय, स्थायी समितीच्या सभागृहात संपूर्ण नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली असून, रंगकाम करत सभागृहाला चकाकी आणली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापासून ते सभागृहापर्यंत रेड कार्पेट अंथरले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद
पडलेला कारंजाही सुरू करण्यात येऊन त्याची चाचणी घेण्याचे काम सुरू होते. बैठकीला प्रधान सचिवांसह आयुक्त, आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी, गटनेते उपस्थित राहणार असून, यावेळी महापालिकेमार्फत विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. महापालिकेला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. त्यासाठीचे पक्षपातळीवर नियोजन केले जात आहे.