येवल्यात लाल कांदा आवक टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 22:22 IST2022-02-14T22:21:47+5:302022-02-14T22:22:20+5:30
योगेंद्र वाघ लोकमत न्यूज नेटवर्क येवला : सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उप बाजार आवारावर लाल कांद्याची ...

येवल्यात लाल कांदा आवक टिकून
योगेंद्र वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारावर लाल कांद्याची आवक टिकून होती. बाजारभावात
वाढ झाल्याचे दिसून आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत व परदेशात मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सप्ताहात कांदा आवक ६१ हजार ८४६ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३०६१, तर सरासरी २५५० रपये प्रतिक्विंटलपर्यंत होता.
उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक २५ हजार २९० क्विंटल झाली असून, लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३०६३, तर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता.
मागील महिन्यात लाल कांद्याची आवक २ लाख ८१ हजार ५३२ क्विंटल झाली होती. बाजारभाव किमान ३०० ते कमाल २४६७, तर सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल होता. चालू महिन्याच्या प्रारंभी लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल २३७७, तर सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल होता. आवकेत घट होत गेली. याबरोबरच परराज्यात, परदेशातही मागणी वाढल्याने बाजारभावात तेजी दिसून येऊ लागली.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. वातावरणातील बदल, खराब हवामान यामुळे कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. याबरोबरच कांदा वजनातही घटल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत बाजारात वाहनांची संख्या अधिक दिसत असताना वजनात माल मात्र कमी बसत आहे.
येत्या मार्च महिन्यापर्यंत लाल कांदा बाजारात येत राहणार असून, बाजारभाव टिकून राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वसाधारणपणे तालुक्यात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू होतात; परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये वातावरण व हवामानातील बदलामुळे ऋतूचक्रच बदलल्यासारखे झाले आहे. परिणामी अजूनही तालुक्यात कांदा लागवड सुरू आहे. हंगाम नसताना पाणी, रोप उपलब्ध आहे, म्हणून कांदा लागवडीचे प्रमाण वाढते आहे. अगद कांदा मार्चपासून बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणातील बदल, खराब हवामान यामुळे या कांद्याचेही उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.