पाडव्याच्या मुहूर्तावर रेड्यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:40 AM2018-11-11T00:40:33+5:302018-11-11T00:40:52+5:30
वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
पंचवटी : वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटी परिसरात रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक व भाविक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी रेड्यांची आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश लिहिण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेले विविध स्वच्छता अभियान, देवदेवतांचे चित्र, विविध संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी दुग्ध व्यावसायिकांनी रेड्यांची सजावट करून पूजन व आरती केली. त्यानंतर सायंकाळी नाग चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर मिरवणूक मार्गावरील गंगाघाट, म्हसोबा महाराज,
पंचवटी कारंजा, दिंडोरी रोड येथील म्हसोबा महाराज मंदिरात रेड्यांना दर्शनासाठी नेण्यात आले. पंचवटी परिसरातील नाग चौक, कृष्णनगर, सरदार चौक, जुना आडगाव नाका, नांदूर, मानूर, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, आडगाव परिसरातील शेकडो दुग्ध व्यावसायिकांनी पंचवटीत बलिप्रतिपदानिमित्ताने रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढली होती. यावेळी भास्कर शिंदे, सुनील शिंदे, मारुती शिंदे, दिगंबर धुमाळ, दिगंबर मोगरे, सतनाम राजपूत, संतोष कांबळे, संदीप देशमुख, विकी जाट, एकनाथ धुमाळ, भूषण शिंदे, सागर गरड, विकी शिंदे, गोपी आव्हाड, अजित शेळके, महेश कल्याणकर, राहुल बोडके, दीपक शिंदे, प्रकाश शिंदे, आदींसह नागरिक उपस्थित होते.