कालिका यात्रेत दुकानांना पोलिसांचा ‘रेड सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:58 AM2019-09-28T00:58:52+5:302019-09-28T00:59:17+5:30
घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे.
नाशिक : घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या ग्रामदेवता कालिका यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच पोलिसांनी नेहमीप्रमाणेच याठिकाणी व्यावसायिकांना स्टॉल आणि अन्य दुकाने उभारण्यास नकारघंटा सुरू केली आहे. महामार्ग बसस्थानक ते गडकरी सिग्नल हा रहदारीचा मार्ग असून त्याठिकाणी शाळा व अन्य शासकीय कार्यालये असल्याने परवानगी देऊ नये अशाप्रकारचे पत्र पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
कालिका यात्रेत वर्षानुवर्षे पूजा साहित्य तसेच अन्य साहित्य खेळण्या यांच्या विक्रीचे स्टॉल्स उभारले जातात. महापालिका त्यासाठी स्टॉलचे भाडेदेखील घेत असते. गेल्या काही वर्षांपासून तर महापालिकेने स्टॉलच्या जागेचे लिलावदेखील केले आहेत. दरम्यान, पोलीस यंत्रणा मात्र या विक्रेत्यांना याठिकाणी बसू देण्यास परवानगी देत नाही. मध्यंतरी एक ते दोन वर्ष तर गडकरी चौक ते कालिका मंदिरदरम्यान रस्त्याच्या एका बाजूनेच दुकाने थाटण्यास परवानगी दिली होती. गेल्यावर्षी तर परवानगी न मिळाल्याने छोट्या विक्रेत्यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या घरावरच ठाण मांडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यंदा महापालिकेने पोलिसांना पत्र पाठवून यात्रेसाठी दुकाने थाटण्याबाबत विचारणा केली होती. त्या आधारे पोलीस उपआयुक्तांनी पत्र पाठवले असून त्यात दुकाने उभारण्यास रेड सिग्नल दिला आहे.
वाहतुकीचा ताण
मुळातच स्मार्ट रोडमुळे याठिकाणी वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यातच दुकाने उभारल्यास रहदारीस अडथळा होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरच आदिवासी विकास भवन, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, रमाबाई आंबेडकर शाळा असून त्यामुळे यात्रेच्या मार्गावर दुकाने उभारण्यास परवानगी देऊ नये असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.