सी प्लेनच्या ‘टेक आॅफ’ला रेड सिग्नल
By admin | Published: October 31, 2014 12:05 AM2014-10-31T00:05:24+5:302014-10-31T00:05:36+5:30
सी प्लेनच्या ‘टेक आॅफ’ला रेड सिग्नल
नाशिक : बहुप्रतिक्षित असलेली सी प्लेनची सेवा सुरू करण्याबाबत येत्या शुक्रवारी (दि. ३१) जुहू चौपाटी ते गंगापूर धरण या मार्गावर सी प्लेनच्या चाचणीचा मुहूर्त मेरिटाइम एनर्जी हेलि एअर सर्व्हिस कंपनी (मेहेर) व जिल्हा प्रशासनाने निश्चित केला होता; मात्र तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे ‘विघ्न’ आल्याने मुहूर्त रद्द करण्यात आला आहे. एकूणच सी प्लेनची चाचणी पुन्हा लांबणीवर गेल्याने जुहू-गंगापूूर धरण सी प्लेन सेवा अधांतरीच राहण्याची चिन्हे आहेत.
नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा मिळावी व सी प्लेनच्या नकाशावर नाशिकला नेण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि ‘मेहेर’ कंपनीने जुहू ते गंगापूर धरण मार्गाची निवड केली आहे; मात्र गेल्या आॅगस्ट महिन्यामध्येही या मार्गावर ‘सेसना’ या सी प्लेनच्या उड्डाणाला खराब हवामानाचा अपशकुन झाला होता. त्यामुळे तो मुहूर्तही टळल्याने नाशिककरांना सी प्लेनचे दर्शन घडू शकले नाही. प्रशासकीय व तांत्रिक अशा काही अडचणींचे विघ्न आल्याने शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गंगापूर धरणावर सी प्लेनचे होणारे लॅण्डिंग रद्द झाले आहे. राज्यातील पवना, मुळा, गंगापूर, भंडारदरा आणि ओझरखेड या धरणांवरून सी प्लेन सेवा या वर्षअखेरीस सुरू करण्याचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईपासून या विमानांच्या चाचण्यांना कंपनीकडून प्रारंभ करण्यात आला असला, तरी जुहू चौपाटी ते गंगापूर धरण या मार्गावरील चाचणीचे अद्याप उड्डाण होऊ शकलेले नाही. त्यामुळे सी प्लेन सेवेबाबात नाशिककरांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)