रामकुंडात जलवाहिनी टाकण्यात ‘रेड सिग्नल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:45 AM2020-07-25T00:45:15+5:302020-07-25T01:14:29+5:30
रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. अर्थात, हा प्रस्ताव रद्द करण्यात आला नसला तरी तूर्तास तो स्थगित करण्यात आला आहे.
नाशिक : रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. अर्थात, हा प्रस्ताव रद्द करण्यात आला नसला तरी तूर्तास तो स्थगित करण्यात आला आहे. गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनसमोर जुने पंचवटी पंपिंग स्टेशन आहे. येथून जाणाऱ्या रॉ वॉटर पाइपलाइनमधून रामकुंडापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव कंपनीने मांडला होता. मात्र, इतक्या लांबून पाणी आणण्याऐवजी पंचवटी येथेच मखमलाबादनाका येथील जलकुंभातून रामकुंडात जलवाहिनीद्वारे पाणी घेण्याचा नवा प्रस्ताव यानिमित्ताने चर्चेत आला आहे. दरम्यान, स्मार्टरोडच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल ठेकेदाराला करण्यात आलेला दंड कंपनीच्या सीईओंनी माफ केल्याने हा विषयदेखील चर्चेत आला. मात्र या संदर्भात पुढील बैठकीत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
नाशिकस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची बैठक शुक्रवारी (दि. २४) कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कंपनीच्या वतीने रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गंगापूररोडवर कुसुमाग्रज उद्यानालगत असलेल्या जुन्या पंपिंग स्टेशनमधून जाणारे जलवाहिनीचे पाणी रामकुंडात आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील ही सूचना योग्य असल्याचे सांगितले त्यामुळे यासंदर्भात व्यवहार्यता पडताळणी करून हा प्रस्ताव पुन्हा कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडावा आणि दुसºया पर्यायांचाही विचार करावा, अशी सूचना कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी केली. त्यावर कुंटे यांनी संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले दरम्यान या बैठकीत कंपनीचे आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तसेच कंपनीचे संचालक म्हणून स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
९५ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित
जलवाहिनीद्वारे हे पाणी रामकुंडात आणण्यासाठी सुमारे ९५ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या संदर्भात कंपनीचे संचालक गुरमित बग्गा व शाहू खैरे यांनी त्यास विरोध केला सध्या रामकुंडात रामवाडी येथील जलकुंभातून पाणी पुरविले जाते मात्र त्यापेक्षा दूरवरील अंतरावरून पाणी आणणे परवडणार नाही त्यापेक्षा महापालिकेच्या जुना विभागीय कार्यालयाच जागेत २४तास पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ बांधण्यात येणार आहे. तेथून जलवाहिनी टाकून रामकुंडात पाणी घेतल्यास अत्यल्प खर्चात हे काम पूर्ण होऊ शकते, असे बग्गा यांनी सांगितले. जवळच असलेल्या इंद्रकुंड येथूनही अशाप्रकारची जलवाहिनी टाकता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.
ठेकेदारांस दंड
नाशिकमध्ये गाजलेल्या त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल ठेकेदारास कंपनीने ३६ हजार रुपये प्रतिदिन असा दंड करण्यात आला होता, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून हा खर्च हा दंड रद्द करण्यात आला आहे. त्याबद्दल महापौर सतीश कुलकर्णी यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना जाब विचारला, मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. केवळ विद्युत पुरवठ्याअभावी काही काम थांबले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील ई-टॉयलेट अन्यत्र स्थलांतरित करण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे आता रस्त्याच्या कामाला ठेकेदाराचा विलंब कारणीभूत नाही. त्यामुळे हा दंड स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.