लाल वादळ निघाले मुंबईच्यादिशेने; हक्काच्या वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी लाँग मार्च
By संदीप भालेराव | Published: March 13, 2023 01:54 PM2023-03-13T13:54:39+5:302023-03-13T13:56:53+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले.
नाशिक: हक्काच्या वनजमिनी ताब्यात मिळाव्यात यासाठी विधीमंडळाकडे निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत आहे. कालपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पासून सुरू झालेले हे लाल वादळ सोमवारी (दि.१३) नाशिक शहरात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. रस्त्यावर कांदा, भाजीपाला फेकून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोर्चा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे माजी आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले.
आदिवासी बांधवांना हक्काच्या वनजमिनी मिळाव्यात या मागणीसाठी रविवार (दि.१२) पासून मोर्चाला सुरूवात झाली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीपासून निघालेला लॉंग मार्च नाशिक शहरात दाखल झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल निशाण हातात घेऊन हजारो आधिवासी बांधव पायी विधानभवनावर निघाले आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार जे.पी. गावित, भाकप नेते अजित नवले, डॉ. डी.एल. कराड, इंद्रजित गावित, सिताराम ठोंबरे आदि करीत आहेत. रविवारी दिंडोरीतून निघालेल्या मोर्चाने रविवारची रात्र नाशिक महानगरपालिका हद्द असलेल्या आरोग्य विद्यापीठा समोरील मोकळ्या मैदानात मुक्काम केल्यानंतर सोमवारी मोर्चेकरी नाशिक शहरात दाखल झाले.