लाल, उन्हाळी कांदा तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:07+5:302021-01-21T04:14:07+5:30

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळी कांद्याबरोबरच लाल कांद्याच्या आवकेतही ...

Red, summer onion boom | लाल, उन्हाळी कांदा तेजीत

लाल, उन्हाळी कांदा तेजीत

Next

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत उन्हाळी कांद्याबरोबरच लाल कांद्याच्या आवकेतही घट आली असून बाजारभाव तेजीत आहेत. लाल कांद्यास सर्वोच्च ३०५१ रुपये, तर उन्हाळी कांद्यास सर्वोच्च २३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या आठ महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा अंतिम टप्प्यात आला असून त्या कांद्याची प्रतवारीही कमालीची घसरली आहे. मात्र लाॅकडाऊननंतर हाॅटेल व्यवसाय सुरू झाल्याने उन्हाळी कांद्याला अद्यापही मागणी असून बाजारभाव तेजीत आहे. या कांद्याला कमीत कमी १००० रुपयेपासून २३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहेत. याउलट दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात लाल (रांगडा) कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजारभावात मोठी घसरण होत होती. परंतु चालू वर्षी कांदा रोपे टाकणीपासून ते लागवडीपर्यंत व शेवटी काढणीपर्यंत अवकाळी पाऊस, दव, धुके, रोगट हवामान आदी अस्मानी-सुलतानी संकटांमुळे कांदा उत्पादनावर विपरीत झाला असून त्याचा परिणाम लाल कांदा आवकेवर झाला आहे.

----------------------

बाजार आवारात सुमारे सहाशे ट्रॅक्टर व तीनशे पिकअप वाहनांमधून १४ ते १५ हजार क्विंटल आव झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत कमी ७५१ रुपये, जास्तीत जास्त ३१५१ रुपये, तर सरासरी २८०० रुपयांपर्यंत होते. गेल्या महिनाभरापासून रोगट हवामान असल्याने लागवड झालेल्या कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याने आगामी काळात कांदा आवकेत पुन्हा घट येण्याची चिन्हे असून बाजारभावात तेजी येण्याची शक्यता कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

------------

सद्यस्थितीत चाळीत साठवून ठेवलेला कांदा संपला असून बाजरी कापणीनंतर लागवड केलेल्या लाल (रांगडा) कांद्यावरही करपा रोगाने थैमान घातल्याने कांदा उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव दोन ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान असले तरीही मजुरी, रासायनिक खते, फवारणी आदींसाठी झालेला खर्च बघता मिळत असलेला बाजारभाव पुरेसा नाही.

- संभाजी देवरे, शेतकरी

-------------

सततच्या रोगट हवामानामुळे आवकेत काही प्रमाणात घट आली. शिवाय बाजारात विक्रीस येत असलेल्या लाल कांद्याची प्रतवारी निर्यातक्षम नसल्याने देशांतर्गत मागणी घटली असून बाजारभाव तसे कमीच आहेत.

- संजय खंडेराव देवरे, कांदा व्यापारी

----------------

उमराणे बाजार समितीत लाल कांद्यास चांगले दर मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, जेणेकरून चांगला बाजारभाव मिळेल.

- नितीन जाधव, सचिव, कृ.ऊ.बा.उमराणे

Web Title: Red, summer onion boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.