रेडीरेकनरच्या दरात यंदा नगण्य वाढ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:10 AM2018-03-16T01:10:29+5:302018-03-16T01:10:29+5:30
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने यंदा नाशिकमधील जमिनींचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात नगण्य वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शहराच्या काही भागात अगदी दीड ते दोन टक्के इतकीच दरवाढ होणार असून, त्या माध्यमातून यंदा विकासकांना तसेच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
संजय पाठक ।

गेल्या तीन ते चार वर्षांत शहरातील बांधकाम व्यवसाय प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना राज्य शासनाने रेडीरेकनरच्या दरात केलेली वाढ ही अत्यंत अडचणीची ठरली होती. अनेक ठिकाणी पंधरा ते वीस टक्के दरवाढ झाल्याने ही दरवाढ व्यवहार्य नसल्याची ओरड झाली होती. अनेक ठिकाणी तर सरकारी दरापेक्षा बाजारातील दर कमी असल्याने व्यवहार कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच रेडीरेकनरसोबत असलेल्या तळटीपेतील अनेक कलमेदेखील अडचणीची ठरली होती. त्यामुळे विकासकांना या तळटीपांना स्थगिती मिळावी यासाठी नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी औरंगाबाद येथेच रेडीरेकनरच्या दरात आता वाढ केली जाणार नसल्याचे अथवा माफक दरवाढ असेल असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता येत्या १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहे.