टोमॅटोंची लाली उतरली; उत्पादक शेतकरी चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:07 AM2019-12-12T05:07:22+5:302019-12-12T05:07:58+5:30
दरात मोठी घसरण; मातीमोल भाव
नाशिक : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेले उत्पादन व स्थानिक उत्पादनास अपेक्षित मागणी नसल्याने टोमॅटो दरात घसरण झाली असून उत्पादक हवालदिल झाले आहेत. टोमॅटोची २० किलोची जाळी ४० ते १२० रूपये पर्यंत विकली जात आहे.
नगदी पिक व वेळेवर चार पैसे मिळवुन देणारे पीक म्हणुन टोमॅटो परिचित आहे. हमखास भाव मिळतो हे गृहित धरुनच उत्पादकांचे प्रतिवर्षी नियोजन असते. मात्र यंदा टोमॅटोला अपेक्षित मागणी नाही. वणी उपबाजार व खोरीफाटा परिसरात सुमारे ४० हजार जाळीची आवक सद्यस्थितीत असुन परराज्यात टोमॅटो विक्रीसाठी जात आहे. मात्र, समाधानकारक दर उत्पादकांना मिळत नाही. कारण सध्या गुजरात राज्यातील स्थानिक ठिकाणच्या उत्पादन केन्द्रात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आवक होत आहे. आकारमान व चवीच्या तुलनेत तो टोमॅटो उजवा ठरतो. स्थानिक ठिकाणी मागणी पूर्ण करून तो टोमॅटो इतर परराज्यात मागणीप्रमाणे पुरविण्यात येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुजरात राज्यात उत्पादन वाढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोंना परराज्यात पाठविण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. त्याचाही प्रतिकुल परिणाम मागणीवर होत असल्याने टोमॅटोला हवी तशी मागणी नाही. या सर्व बाबीमुळे टोमॅटो लागवड व उत्पादन खर्च याचा ताळमेळ जमेनासा झाल्याने खुडणी, वाहतुक व विक्री याचे गणित जुळविताना उत्पादकांच्या नाकीनव आले आहे. तसेच राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यातुन टोमॅटो दिल्ली व पंजाब येथे विक्रीसाठी जात आहे.