तोटा कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बसच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 08:04 PM2020-01-28T20:04:35+5:302020-01-28T20:06:50+5:30
नाशिक- महापालिकेच्या वतीने बस सेवा चालविताना वर्षाकाठी तब्बल ५५ कोटींचा तोटा येणार असून तो कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीकल बसची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीडशे ऐवजी आता फक्त ५० बस वापरण्यात येणार असून त्यामुळे तोटा कमी होऊन तो ३५ कोटी रूपयांवर येणार आहे.
नाशिक- महापालिकेच्या वतीने बस सेवा चालविताना वर्षाकाठी तब्बल ५५ कोटींचा तोटा येणार असून तो कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीकल बसची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीडशे ऐवजी आता फक्त ५० बस वापरण्यात येणार असून त्यामुळे तोटा कमी होऊन तो ३५ कोटी रूपयांवर येणार आहे.
महापालिकेच्या बस सेवेसंदर्भात महापालिकेतील सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिकेच्या प्रस्तावाची माहिती देण्यात आली.
महापालिकेने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच घेतला आहे. त्यावेळी एकुुण चारशे बस ठेकेदारामार्फत चालवून त्याला प्रति किलो मीटर दर देण्याचे ठरले होते. त्यात दोनशे बस सीएनजी तर दोनशे डिजेल बस वापरण्याचा प्रस्ताव होता. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला आल्यानंतर त्यांनी पर्यावरण स्नेही इलेक्ट्रीकच्या बस वापरण्याचा सल्ला दिल्याने महापालिकेने प्रस्तावात बदल करून दीडशे इलेक्ट्रीक बस, दोनशे सीएनजी आणि पन्नास मिडी डिझेल बस घेण्याचे ठरविले होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात हिशेब काढला तेव्हा बस सेवेसाठी असे नियोजन केल्यास वर्षाकाठी ५५ कोटी रूपये खर्च होईल असे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिकेने फेरविचार केला. इलेक्ट्रीक बसचा खर्च काढला तर केंद्र शासनाकडून प्रति इलेक्ट्रीक बस साठी पन्नास लाख रूपयांचे अनुदान मिळते. हे अनुदान जास्तीत जास्त पन्नास बस साठी दिले जाते. त्यामुळे महापालिकेने इलेक्ट्रीक बस अधिक महागात पडत असल्याने त्यांची संख्या घटविली असून आता दीडशे ऐवजी फक्त ५० बस ठेकेदाराला खरेदी करून वापरण्यास सांगण्यात आले आहे. चारशे ऐवजी तीनशे बसचाच वापर करण्यात येणार असल्याने महापालिकेचा तोटा घटणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले.