जिल्ह्यातील धरणांमधील विसर्गात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 01:43 AM2021-09-16T01:43:39+5:302021-09-16T01:44:56+5:30
पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील बारा धरणप्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारपासून कपात करण्यात आली. त्यामुळे नदी-नाल्यांना असलेली पूरपरिस्थिती निवळत आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सकाळी १६५९ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ५५३ इतका करण्यात आला.
नाशिक: पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील बारा धरणप्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारपासून कपात करण्यात आली. त्यामुळे नदी-नाल्यांना असलेली पूरपरिस्थिती निवळत आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सकाळी १६५९ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ५५३ इतका करण्यात आला.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जिल्ह्यातील १२ जलप्रकल्पांमधून विसर्ग करण्याची वेळ आली. त्यामुळे नदी, नाले तसेच ओढ्यांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्लादेखील देण्यात आला. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातूनदेखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. तर दारणा, वालदेवी मधूनही हजारो क्युसेकपाणी सोडले जात होते. आता पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वत्र विसर्ग कमी करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी दारणा धरणातून ७२००, कडवामधून ८४८, आळंदीमधून ८०, वालदेवी धरणातून ५९९ तर गंगापूर धरणातून १६५९ पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणांमधून सुरू करण्यात आलेला विसर्ग कायम असताना दुपारी तीन वाजता यामध्ये कपात करण्यात आली. दारणा धरणातून २६७२ क्युकेस इतका विसर्ग करण्यात आला तर कडवामधील विसर्ग वाढविण्याची वेळ आली. धरण क्षेत्रात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे १२७२ पर्यंत विसर्ग वाढवावा लागला. सायंकाळी ३ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गात कपात करून ११०६ इतका विसर्ग करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता त्यामध्ये अधिक कपात होऊन अवघे ५५३ क्युसेक इतका विसर्ग सुरू होता.