कंत्राटी खासगी कर्मचाऱ्यांची नोंदणीच कमी झाल्याने डोसच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:12 AM2021-01-15T04:12:59+5:302021-01-15T04:12:59+5:30

नाशिक : जिल्ह्यात कोरोना कालावधीत बहुतांश खासगी कोविड हॉस्पिटल्सनी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. मात्र, ऑक्टोबरपासून जसे कोरोनाचे ...

The reduction in the number of doses is due to the decline in the enrollment of contract private employees | कंत्राटी खासगी कर्मचाऱ्यांची नोंदणीच कमी झाल्याने डोसच्या संख्येत घट

कंत्राटी खासगी कर्मचाऱ्यांची नोंदणीच कमी झाल्याने डोसच्या संख्येत घट

Next

नाशिक : जिल्ह्यात कोरोना कालावधीत बहुतांश खासगी कोविड हॉस्पिटल्सनी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. मात्र, ऑक्टोबरपासून जसे कोरोनाचे प्रमाण कमी होत गेले, तसे वर्षअखेरीस या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना कामावरून कमी केले. तसेच उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांचीदेखील कोरोना लसीसाठी नोंदणी केलीच नसल्याने कोरोना काळात वर्षभर सेवा देऊनदेखील ते कर्मचारी कोरोनाच्या लसीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे एकूणच खासगी कर्मचाऱ्यांची नोंदणीच कमी झाल्याने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यासाठी आलेल्या कोरोना लसीची संख्यादेखील घटली असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेत झोकून दिले आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल खासगी हॉस्पिटल्सची भूमिका उदासीन आहे. त्यामुळेच कोरोना लसीकरणासाठीच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या नोंदणीसाठी फार कमी खासगी हॉस्पिटल्सनी पुढाकार घेतला. कोरोना संकटात माघार न घेता, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अखंडपणे रुग्णसेवा केली आहे. तुलनेत अत्यल्प रकमेवर काम करावे लागूनही नोकरी मिळाल्याच्या आनंदात या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यामुळेच अनेक खासगी हॉस्पिटल्सचे कोरोनामुक्तीचे प्रमाण खूप चांगले होते. मात्र, याच कोरोना योद्ध्यांची संबंधित खासगी हॉस्पिटल्सकडून आणि पर्यायाने सरकारकडून त्यांच्या कार्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच हे कंत्राटी कर्मचारी कोरोनापासून वंचित आहेत. जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत एकूण १८ हजार १३५ शासकीय व १२ हजार ४८० खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणजे जे कर्मचारी शासकीयच्या तुलनेत दीडपट असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती संख्या शहराच्या तुलनेत दोन तृतीयांश आहे.

इन्फो

लसीकरणाची प्रक्रिया

लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचे यावेळी प्रथम लाभार्थीचे तापमान घेण्यात येऊन सॅनिटाइज केले जाईल. दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये लाभार्थीची ओळखपत्रानुसार कोविन ॲप या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करण्यात येऊन त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या निरीक्षण रूममध्ये लाभार्थीला ३० मिनिटे परीक्षणासाठी बसविण्यात येणार आहे. या तिन्ही रूममध्ये कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांच्या माहितीचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात लस साठविण्यासाठी २१० आयएलआर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

इन्फो

जिकिरीच्या काळात सेवा देऊनही नाही लस

ज्या काळात घरातील माणसेही आपल्याच कुटुंबातील दुसऱ्या कोरोनाबाधिताच्या जवळ जात नव्हते, अशा अत्यंत जिकिरीच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. जिल्ह्यात हजारो नागरिकांचे प्राण वाचविण्यात या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. अशा परिस्थितीत कोरोना आटोक्यात आला, म्हणून त्यांच्या सेवेला खंडित केले असले तरी ज्या खासगी रुग्णालयांनी त्यांची सेवा घेतली, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाव नोंदविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक ठरते.

Web Title: The reduction in the number of doses is due to the decline in the enrollment of contract private employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.