ऑनलाईन गुणांकनातील मानवी चूक प्रकरणातील दंडाच्या रक्कमेत कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:48 PM2020-06-13T12:48:17+5:302020-06-13T12:54:19+5:30
महाविद्यालीन परीक्षाचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास होणाऱ्या दंडाच्या तरतुदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी आकारला जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे.
नाशिक : महाविद्यालीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास होणाऱ्या दंडाच्या तरतुदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारणा करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये यापूर्वी आकारला जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. सुधारित तरतुदीनुसार प्राध्यापक अथवा महाविद्यालयांकडून अशी मानवी चूक घडल्यास पाच हजार रुपयांऐवजी केवळ एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना परीक्षेचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास दंडात्मक तरतूद होती. यापूर्वी परीक्षांचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास प्राध्यापक किंवा महाविद्यालयास सुमारे पाच हजार रुपये दंड होता. तसेच पुढील दोन वर्षे प्राध्यापक किंवा महाविद्यालयास विद्यापीठाकडून वर्धापन दिनी दिल्या जाणाऱ्या व्यक्तिगत पुरस्कारांपासून व विविध योजनांसाठी अर्ज करता येत नव्हता. विद्यापीठाच्या आता घेतलेल्या निर्णयामुळे यापुढे संबंधित प्राध्यापक, महाविद्यालयास विद्यापीठापासून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार आणि विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार नाही. या निर्णयामुळे प्राध्यापक, महाविद्यालयांना दिलासा मिळणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर तांत्रिक चुका होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसे खर्च होण्यासह मनस्तापाला सामोरे जावे लागते. परंतु विद्यापीठाच्या या चुकांना एक रुपयाही दंड आकारला जात नाही. प्राध्यापक अथवा महाविद्यालयांकडून एखादी मानवी चूक झाल्यास दंडात्मक कारवाई का? अशी भूमिका होती. अन्यायकारक बाबीवर व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेत शिक्षा सौम्य केल्याने प्राध्यापक व महाविद्यालयांनाही दिलासा मिळाला आहे.
-डॉ. नंदू पवार, अधिसभा सदस्य, पुणे विद्यापीठ