संदर्भ रुग्णालयात आंदोलन : वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:08 AM2018-07-01T01:08:16+5:302018-07-01T01:08:31+5:30
राष्टवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.
नाशिक : राष्टवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले. उत्तर महाराष्टतील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून २००८ साली विभागीय संदर्भ रुग्णालय उभारण्यात आले; मात्र सद्यस्थितीत रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागत आहे. त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यांपासून हृदय बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे यंत्र बंद अवस्थेत असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.
अशात राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक मोर्चा काढीत याबाबतची तक्रार केली. त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी लवकरात लवकर सर्व सुविधा सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेवक समिना मेमन, हिना शेख, रंजना गांगुर्डे, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्ष आशा भंदुरे, सलमान शेख, शकिरा शेख, सुरेखा निमसे, सुजाता कोल्हे, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सईदा शेख आदी उपस्थित होते.