संदर्भ रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:33 AM2018-03-26T00:33:55+5:302018-03-26T00:33:55+5:30
नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
नाशिक : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली. यासंदर्भात आमदार जयंत जाधव यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग कागदोपत्रीच चालू आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी मान्यता मिळालेली असूनही यासाठी आवश्यक नेफ्रॉलॉजिस्ट, तंत्रज्ञ, आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची पूर्तता झालेली नाही. या रुग्णालयात डायलिसीससाठी दरदिवशी २० रुग्णांची प्रतीक्षा यादी असून, तीन सत्रात डायलिसीस करण्यासाठी रुग्णालयास १० डायलिसीस यंत्रे व डायलिसीस खुर्च्यांची तसेच आवश्यक मनुष्यबळाची निकड आहे. तसेच अमरावतीच्या संदर्भ सेवा रुग्णालयाप्रमाणे नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये प्लास्टिक सर्जरी, न्यूरोलॉजी आणि पेडियाट्रिक आदी विकारांवरील विभाग सुरू करण्यासाठी येथे दोन मजले वाढवून २०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. येथील कामाचा व्याप लक्षात घेता आकृतिबंधाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरूपात वैद्यकीय व शुश्रूषा संवर्गातील परिचारिकांची पदे नव्याने निर्माण करून सदर पदे भरण्याबाबत विभागीय उपसंचालकांनी शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रुग्णालयाचे २०० बेडमध्ये रूपांतर करण्याची गरज असून, येथील मूत्रपिंड शस्त्रक्रिया विभाग लवकरत लवकर सुरू करण्यासाठी शासनामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, नाशिकच्या संदर्भ सेवा रुग्णालयातील मूत्रपिंड शस्त्रक्रिया येत्या दोन महिन्यांच्या आत सुरू करण्यात येईल, असे त्यांनी आमदार जाधव यांना आश्वासित केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना मूत्रपिंड शस्त्रक्रिया करण्यासाठी लवकरच नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा जिल्ह्यातील अनेक रुग्णांना फायदा होणार आहे.
शंभरावर पदे रिक्त
मंजूर आकृतिबंधाप्रमाणे ३६७ पदांपैकी ९२ पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेअंतर्गत उपचारासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. येथे अतिविशेषोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी शंभरावर पदे रिक्त आहेत.