सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना मिळाला परतावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:51 AM2019-04-21T00:51:14+5:302019-04-21T00:51:30+5:30
महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला.
नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळातील जवळपास २४ लाख वीज ग्राहकांना गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर (अनामत रक्कम) ३३ कोटी २१ लाख रुपयांचा व्याज परतावा मिळाला. यात नाशिक जिल्ह्यातील वीज ग्राहकांना २० कोटी २३ लाख रुपयांचा परतावा त्यांच्या वीज बिलातून मिळाला. वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.
वीज कायद्यानुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव वसूल करण्याचे अधिकार महावितरणला देण्यात आले आहेत. ग्राहकांना पुरवठा केलेल्या विजेचे पैसे महावितरणकडे जमा होण्यास जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
ही बाब लक्षात घेऊन कायद्यात सुरक्षा ठेवीची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत कायद्याच्या या तरतुदीतच वीज कंपनीने सुरक्षा ठेवीपोटी किती रक्कम आकारावी यासंदर्भात स्पष्ट नियम आहेत.
गत आर्थिक वर्षातील (एप्रिल ते मार्च) ग्राहकाच्या एकूण वीज वापराची सरासरी काढून एक महिन्याचे बिल सुरक्षा ठेव म्हणून वसूल करण्यात येते. नवीन ग्राहकांसाठी तीन महिन्यांची सरासरी काढली जाते. उदा. एका ग्राहकाचा एकूण वार्षिक वीज वापर ३६०० रु पये असेल तर या ग्राहकाने सरासरीनुसार एका महिन्याचे बिल म्हणजेच ३०० रु पये सुरक्षा ठेवीपोटी महावितरणकडे भरणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात या ग्राहकाचा वार्षिक वीजवापर ४२०० रु पये झाल्यास ठरलेल्या सूत्रानुसार व सरासरीप्रमाणे सुरक्षा ठेवीची रक्कम ३५० रु पये होईल. संबंधित ग्राहकाचे ३०० रु पये पूर्वीच जमा असल्याने त्याला सुरक्षा ठेवीपोटी वीज कंपनीकडे फक्त ५० रुपये अतिरिक्त भरावे लागतील. सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा भरणा करण्यासाठी नियमित वीजबिलाशिवाय स्वतंत्र बिल ग्राहकाला दिले जाते.
महावितरण सध्या ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर साडेदहा टक्के व्याज देत आहे. सुरक्षा ठेवीवर मिळणारे व्याज ग्राहकाच्या वीज बिलात निर्धारित महिन्यात जमा करण्यात येते. सर्वसाधारणपणे मे ते जून महिन्याच्या बिलात व्याजाची रक्कम ग्राहकाच्या बिलात जमा करण्यात येते. त्यामुळे संबंधित महिन्याच्या एकूण वीज बिलातून व्याजाची रक्कम कमी केली जाते. सध्या विविध बँका व वित्तीय संस्थांकडून ठेवीवर मिळणारा व्याजदर लक्षात घेता महावितरणच्या सुरक्षा ठेवीवर मिळणारा परतावा अधिक आहे. दरमहा येणाऱ्या वीज बिलात ग्राहकाची किती सुरक्षा ठेव जमा आहे, याचा तपशील देण्यात येतो.
नाशिक परिमंडळात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात २३ लाख ९९ हजार ५०० ग्राहकांच्या सुमारे २९७ कोटी सुरक्षा ठेवीवर व्याजाच्या रूपाने २३ कोटी रुपयांचा परतावा त्यांच्या वीज बिलातून देण्यात आला. यात नाशिक जिल्ह्यातील १३ लाख ९८ हजार वीज ग्राहकांना १४ कोटी रु पयांचे व्याज मिळाले. तर गेल्या आर्थिक वर्षात (२०१६-१७) परिमंडळातील ग्राहकांना त्यांच्या ३१५ कोटी रु पये सुरक्षा ठेवीवर ३३ कोटी २१ लाख रु पये व्याज मिळाले. यात नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांना २० कोटी २३ लाख रु पये व्याजाचा परतावा वीज बिलातून मिळाला.