बाटलीत पेट्रोल देण्यास नकार; पेट्रोल पंपाच्या मॅनेजरचे डोके फायटरने फोडले
By अझहर शेख | Published: October 8, 2023 03:11 PM2023-10-08T15:11:04+5:302023-10-08T15:11:17+5:30
हल्लेखोरांनी पवार यांना बेदम मारहाण करत जखमी केल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरून पळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे
नाशिक - वडाळागावाजवळ सावता माळी कॅनॉल रस्त्यावर असलेल्या देवरे पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाला दुचाकीने आलेल्या चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे दुचाकीस्वारांनी फायटरने हल्ला केल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
खोडेनगर कॅनॉलरोडला लागून असलेल्या एम.एस.देवरे पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून फिर्यादी तुषार बापू पवार (३३,रा.राजसारथी सोसा.) हे नेहमीप्रमाणे नोकरीवर हजर झालेले होते. शनिवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पवार हे पंपावरील कॅबिनमध्ये बसून कामकाज करत असताना तेथे दुचाकीने आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने ‘तू इकडे ये रे...’ असे म्हणून पवार यांना कॅबीनबाहेर बोलावून घेतले. ‘मला बाटलीत पेट्रोल पाहिजे आहे, मला तू किंवा तुझ्या लोकांना सांग पेट्रोल देण्यास असे त्या इसमाने सांगितले. पवार यांनी त्यास शासकिय नियमानुसार बाटलीत पेट्रोल देता येत नाही, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून त्याने मोबाइलवरून कोणाला तरी कॉल केला. यानंतर तेथे अजुन दोन ते तीन तरूण दुचाकीने आले. या चौघांनी मिळून संगनमताने पवार यांना मारहाण केली.
हाताच्या चापटीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून त्यांच्यापैकी एका अज्ञात व्यक्तीने लोखंडी फायटरसारख्या वस्तूने डोक्यावर प्रहार केल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. डाव्या कानाच्या वरच्या भागात डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी व मालकांनी कॉलेजरोडवरील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा सगळा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. मुंबईनाका पोलिसांनी पवार यांच्या जबाबावरून अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा शाोध सुरू केला आहे.
जीवे मारण्याची दिली धमकी
हल्लेखोरांनी पवार यांना बेदम मारहाण करत जखमी केल्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरून पळ काढल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. बळजबरीने बाटलीत पेट्रोल मागून कर्मचाऱ्यांसोबत अथवा अशाप्रकारे व्यवस्थापकासोबत वाद घालण्याचे प्रकार शहर व परिसरातील पेट्रोल पंपांवर वारंवार घडत असतात. यामुळे अनेकदा कर्मचारीसुद्धा भीतीपोटी चोरीछुप्या पद्धतीने बाटलीत पेट्रोल देऊन मोकळे होतात.