घरपट्टी लागू करण्यासाठी मुंडण करत निषेध
By admin | Published: April 19, 2017 02:37 PM2017-04-19T14:37:09+5:302017-04-19T15:12:01+5:30
विविध मागण्यांसाठी गौतमनगर, साठेनगर, रमाबाईनगर, शांतीनगर येथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला.
नाशिक - वसाहतींना घरपट्टी लागू करावी, पाणीपुरवठ्याची सुविधा पुरवावी यासह विविध मागण्यांसाठी गौतमनगर, साठेनगर, रमाबाईनगर, शांतीनगर येथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. याचवेळी काही नागरिकांनी मुंडण करत महापालिकेचा निषेधही नोंदविला.
मनसेचे सरचिटणीस प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा अण्णाभाऊ साठे पुतळा, शालीमार मार्गे राजीव गांधीवभवनवर नेण्यात आला. संबंधित परिसरातील वसाहतींना घरपट्टी त्वरित लागू करावी, ज्यांचा जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान योजनेंअंतर्गत घरकुलाला विरोध आहे, त्यांना आहे त्या ठिकाणीच घरकुले देण्यात यावीत, वंचित लोकांचा सर्वे करुन त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करुन घ्यावे, गौतमनगर, साठेनगर या भागात बांधण्यात येणाऱ्या गट शौचालयांचे अपूर्ण काम पूर्ण करावे, वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग अंतर्गत सर्व्हे करुन त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले. तत्पूर्वी, राजीव गांधीभवनसमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली तसेच काही लोकांनी निषेध म्हणून मुंडणही केले.