पीएम केअर फंडातील ६० व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:03+5:302021-05-15T04:13:03+5:30
केंद्र शासनाने गेल्या वर्षी ५६ व्हेंटिलेटर्स दिले होते. त्यातील २० व्हेंटिलेटर्स महापालिकेने नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ.वसंत ...
केंद्र शासनाने गेल्या वर्षी ५६ व्हेंटिलेटर्स दिले होते. त्यातील २० व्हेंटिलेटर्स महापालिकेने नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला वीस व्हेंटिलेटर देण्यात आले. मात्र, त्यानंतर महापालिका वापरात असलेले अनेक व्हेंटिलेटर्स बंद होते. त्यातील काही सुरू झाले असले, तरी चार व्हेंटिलेटर्स बंद आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पीएम केअर फंडातून नाशिक महापालिकेला ६० व्हेंटिलेटर्स नोएडा येथील कंपनीने पाठविले आहेत. महापालिकेच्या बिटको रुग्णालयाात हे व्हेंटिलेटर्स गेल्या २० एप्रिल रोजी मिळाले आहेत. मात्र, या व्हेंटिलेटर्सला सेन्सर, स्टॅंड असे काहीच नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर्स आले, तरी ते कार्यान्वित होऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे.
केवळ सुटे भाग मिळत नसल्याने, व्हेंटिलेटर्स पडून असल्याने महापालिकेने केंद्र शासनाच्या पुरवठादार कंपनीकडे पाठपुरावा केला. सुरुवातीला सेंसर आणि अन्य सुटे भाग मिळत नाही. ते मिळल्यानंतर कंपनीचे तंत्रज्ञ व्हेंटिलेटर्स सुरू करून देणार होते. मात्र, नंतर नोएडा स्थित कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर कंपनीने हात वर केले आहेत. सुटे भाग स्वत:च खरेदी करून बसवून घ्या, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे कोविड सेलचे प्रमुख डॉ.आवेश पलोड यांनी गुरुवारी (दि.१३) कंपनीकडे केंद्र शासनाने दिलेल्या वर्क ऑर्डरची कॉपी मागितली आहे. ती मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
इन्फो...
महापालिकेला सुटे भाग खरेदी करणे कठीण नाही. मुळातच ते उपबल्ध होत नाही, तसेच केंद्र शासनाने संबंधित कंपनीला केवळ व्हेंटिलेटर्स पुरविण्याचे आदेश दिले होते की, संपूर्ण साहित्य देऊन इंस्टॉल करण्याचे आदेश दिले होते, याची माहिती घेतली जात आहे. जर केंद्र सरकारने संंबंधित कंपनीला सर्व साहित्य पुरविण्यासहीत काम दिले असेल, तर महापालिकेने अकारण खरेदी का करावी, असा प्रश्न महापालिकेने उपस्थित केला आहे.