भरघोस उत्पन्न देत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Published: January 7, 2015 01:35 AM2015-01-07T01:35:58+5:302015-01-07T01:36:23+5:30
ताहाराबाद आठवडे बाजार समस्याग्रस्त
ताहाराबाद : येथील ग्रामपंचायतीला सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेला विविध समस्यांनी घेरल्याने व्यावसायिक व ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
बागलाण तालुक्यातील मोठ्या आठवडे बाजारात ताहाराबादचा समावेश होतो. तालुक्याबरोबर बाहेरील अनेक व्यापारी व्यवसायानिमित्त ताहाराबादच्या आठवडे बाजाराला येतात. बाजारानिमित्त शेकडो व्यापारी व हजारो ग्रामस्थांची या ठिकाणी हजेरी लागते. रविवारीआठवडे बाजार भरत असल्याने नोकरदार वर्गाचीही येथे मोठी हजेरी लागते. मात्र आठवडे बाजाराला समस्यांची घरघर लागल्याने व्यापारी व ग्रामस्थ आल्यानंतर तेथील परिस्थितीला वैतागून जातात.
बाजारपेठेच्या माध्यातून नाला जातो. या नाल्यास पूर्वी पावसाळ्यात पाणी जायचे; पण अलिकडे नालाबांध असल्याने पावसाळ्यात अधून-मधून पाणी जाते. या ठिकाणी भूमिगत नाला बांधणे काळाची गरज आहे. पण सध्या गावाचे सांडपाणी वाहणारी मोठी चारी बाजारातून वाहते. या चारीचे गटारीत रूपांतर होऊन निर्माण होणारी दुर्गंधी थांबविणे आवश्यक आहे.