वीजबिल सवलतीची क्षेत्रीय कार्यालयांना माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:31+5:302021-03-18T04:14:31+5:30

नाशिक : वीजबिल भरण्याची तयारी दाखविणाऱ्या ग्राहकांना अटी-शर्तींसह हप्ते बांधून देण्यासाठीचे परिपत्रक महावितरण कार्यालयाने काढलेले आहे. मात्र क्षेत्रीय कार्यालयाकडून ...

Regional offices are not aware of electricity bill concessions | वीजबिल सवलतीची क्षेत्रीय कार्यालयांना माहितीच नाही

वीजबिल सवलतीची क्षेत्रीय कार्यालयांना माहितीच नाही

Next

नाशिक : वीजबिल भरण्याची तयारी दाखविणाऱ्या ग्राहकांना अटी-शर्तींसह हप्ते बांधून देण्यासाठीचे परिपत्रक महावितरण कार्यालयाने काढलेले आहे. मात्र क्षेत्रीय कार्यालयाकडून इन्कार केला जात असून, अशाप्रकारची सवलत दिलीच जात नसल्याची भूमिका घेत ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करीत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

विजेची आकारणी, भरणा आणि वसुलीचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. गेल्यावर्षी कोरेानाकाळात आलेल्या वीजबिलांबाबत प्रशासकीय आणि राजकीय भूमिकादेखील चर्चेत राहिल्या आहेत. महावितरणने आता वीजबिल वसुलीचा धडाका सुरू केला आहे. महावितरणकडून वीजबिल वसुली करताना प्रसंगी ग्राहकांची वीजदेखील कापली जात असल्याने सध्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद‌्भवत आहेत. मात्र यातून कोणताही तोडगा काढण्याची मानसिकता महावितरणचे अभियंता आणि कर्मचारी दाखवित नसल्याने वाद विकोपाला जात आहेत.

गेल्या १३ नोव्हेंबर २०२० रोजी महावितरणने परित्रक काढून ग्राहकांना सवलतीचे हप्ते बांधून देण्याची येाजना सुरू केलेली आहे. यामध्ये ग्राहकाला मूळ बिलाबरोबरच दंडात्मक रक्कमदेखील हप्ते बांधून भरण्याची योजना अंमलात आणलेली होती. परंतु नाशिकमधील क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने सवलतीचा लाभ देण्यासाठी नकार दिला जात आहे. अशा प्रकारचे परिपत्रक प्राप्तच झाले नसल्याचे सांगून ग्राहकांना लोखो रुपयांची थकबाकी काही दिवसात भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. यातील अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितदेखील करण्यात आलेला आहे.

गेल्या लॉकडाऊनच्या काळात महावितरणने तीन महिन्यांची बिले एकदमच पाठविली. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या रक्कमेची बिले आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. बिले अवास्तव आणि चुकीचे असल्याचा आरोप करीत ग्राहकांनी वीजबिल भरण्यास नकार दिला. आता थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जात आहे. दुसरीकडे सवलत मागणाऱ्या ग्राहकांना मात्र अशाप्रकारची कोणतीही सवलत नसल्याचे उत्तर दिले जात आहे. सवलतीचे हप्ते बांधून देण्यासाठी असे कोणतेही परिपत्रक नसल्याचे सांगून पूर्ण रक्कम भरण्याचा आग्रह केला जात आहे. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सवलतीची माहिती खरोखर पोहचली नाही की माहिती दडविली जात आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत. ग्राहकांना पुरेशी माहितीदेखील दिली जात नसल्याने तसेच उलट वीज कनेक्शन तोडले जात असल्याने ग्राहकांचा संताप अनावर झालेला आहे.

--इन्फो--

परिपत्रकाच्या फायद्यापासून ग्राहक वंचित

मूळ विजेची रक्कम आणि त्यावरील व्याज यांचे हप्ते बांधून देऊन ग्राहकांकडून वीजबिल वसूल करण्यासाठी महावितरणने परिपत्रक काढले आहे. मात्र अशा प्रकारची सवलत नसल्याची भूमिका क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता घेत असल्याने त्यांना खरेच आदेश नाहीत की ग्राहकांना लाभ द्यायचा नाही याबाबतची संभ्रमावस्था आहे.

--कोट--

अन्यथा घंटानाद

सवलत योजनेचा लाभ ग्राहकांना नाकारला जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. असे होत असेल तर ही गंभीर आणि बेकायदेशीर बाब आहे. मुख्य अभियंत्यांनी याबाबतची त्वरित कारवाई करावी अन्यता वीजग्राहक संघटना मुख्य अभियंता कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करेल.

- सिद्धार्थ वर्मा, वीजग्राहक समिती

--कोट--

व्याजासह सवलतीचे हप्ते देण्याचे महावितरणचे परिपत्रक आहे. मात्र असे कोणतेही पत्र नसल्याचे एमएसईबीचे अधिकारी सांगतात. काही पैसे भरूनही आता पूर्ण बिलासाठी तगादा लावला आहे. लाइट कट करण्याची धमकी दिली जात आहे. चार-पाच कर्मचारी रोज येऊन वसुली आणि वीज कनेक्शन तोडण्याची भाषा करून एक प्रकारे छळ करीत आहेत.

- स्नेहल अहिराव, अहिरराव लॅब

Web Title: Regional offices are not aware of electricity bill concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.