प्रादेशिक परिवहन विभाग : वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक
By admin | Published: December 19, 2014 12:44 AM2014-12-19T00:44:10+5:302014-12-19T00:44:22+5:30
करारनामा संपल्याने स्मार्टकार्ड बंद
पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची नोंदणी केल्यानंतर वाहनधारकांना देण्यात येणारे स्मार्टकार्ड कंपनीचा करारनामा संपल्याने बंद करण्यात आले आहे. आरटीओत वाहन नोंदणी केल्यानंतर स्मार्टकार्डऐवजी आता प्रिप्रिंटेड स्टेशनरी ( संगणकीय प्रत) दिली जात आहे मात्र स्मार्टकार्डच्या नावाखाली वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक केली जात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
शासनातर्फे काही वर्षांपूर्वी प्रिप्रिंटेड स्टेशनरी बंद करून त्याऐवजी वाहनधारकांना स्मार्टकार्ड देण्याची सुविधा करण्यात आली होती. या स्मार्टकार्डसाठी विशेष शुल्क वाहनधारकाकडून आकारले जायचे. सर्वच कागदपत्रे एकाच कार्डवर असल्याने वाहनधारकांची गैरसोय यानिमित्ताने टळायची; परंतु आता स्मार्टकार्डच बंद झाल्याने वाहनधारकांना वाहनांबाबतची सर्व कागदपत्रेबरोबर ठेवावी लागत आहे. स्मार्टकार्डचा ठेका रोजमार्ट या कंपनीला देण्यात आलेला होता; मात्र काही दिवसांपूर्वीच करारनामा संपल्याने कंपनीने स्मार्ट कार्ड देणे बंद केले आहे. त्यामुळे आता आरटीओत नवीन वाहनांची नोंदणी तसेच अन्य वाहनासंबंधित कामांसाठी वाहनधारकांना संगणकीय प्रत दिली जात आहे. करारनामा संपण्यापूर्वी ज्या वाहनधारकांनी वाहनांची नोंदणी केली तसेच त्यासाठीचे शुल्क भरले आहे. त्यांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून स्मार्टकार्ड बंद झाल्याने आता वाहनासंबंधित नोंदणी करणाऱ्या वाहनधारकांना संगणकीय प्रत दिली जात आहे. रस्त्याने वाहने नेताना वाहन तपासणीदरम्यान वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहने अडवून कागदपत्रे मागितली; तर संबंधित वाहनधारकांनी कागदपत्रे दाखवूनही वाहतूक पोलीस स्मार्टकार्ड दाखवा नाही, तर दंड भरा, अशी भूमिका घेत असल्याने वाहनधारकांना कागदपत्रे असूनही विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)