२४ हजार नवमतदारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:22 AM2019-10-14T00:22:43+5:302019-10-14T00:23:34+5:30
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या नवीन मतदारांच्या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे.
नाशिक : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सप्टेंबर महिन्यात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांनादेखील नाव नोंदणीची संधी मिळावी यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २४,५०० मतदार नवमतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. या नवीन मतदारांच्या नोंदणीनंतर जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ४५ लाख ५८ हजार १८६ इतकी झाली आहे.
मतदान यादीत पारदर्शकता यावी आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यात यावी यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी व्यापक मतदार जागृती अभियान राबविण्यात येऊन याद्यांची पडताळणी करण्यात आली होती. या मोहिमेतून सुमारे ५४ हजार इतकी दुबार नावे वगळण्यात आली तर नवीन नोंदणीतून जवळपास १७ हजार नवीन मतदारही जोडले गेले. त्यामुळे गेल्या ३१ आॅगस्ट रोजी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार ४५ लाख ३३ हजार ६३९ अंतिम मतदारांची यादी तयार करण्यात आली होती.
अंतिम मतदारयादी तयार झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रमदेखील जाहीर केला होता. या कार्यक्रमादरम्यान जे नवमतदार मागील महिन्यातच १८ वर्षांचे झाले, परंतु त्यांचे नाव नोंदविणे शक्य नव्हे अशा नवमतदारांसाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा मतदारांसाठी ४ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणीची मुदत जाहीर केली होती.
या कालावधीत सुमारे अडीच हजार नवमतदारांनी जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून नाव नोंदणीला प्रतिसाद दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २४,५४७ इतक्या नवमतदारांनी आपली नावे नोंदविण्याला प्राधान्य दिले आहे. बहुतांश तरुणांनी स्वत:हून निवडणूक शाखेत जाऊन आपली नावे नोंदविली.
—इन्फो—
राज्यात पाच लाख नवमतदारांची नोंदणी
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात ४ आॅक्टोबर पर्यंत नव्याने ४ लाख ९० हजार ५० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० अशी झाली आहे. राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वांत जास्त म्हणजेच ५ लाख ५७ हजार ५०७ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच एकूण २ लाख ३ हजार ७७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.