जोखमीच्या व्यवसायात काम करणाऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:10 PM2020-12-25T19:10:38+5:302020-12-26T00:42:36+5:30
सिन्नर : नागरी भागातील जोखमीचे अथवा धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या स्वच्छता क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, सायकलरिक्षा किंवा हाताने गाडी ओढणारे कामगार आदी व्यक्तींचे बचतगट तयार केले जात आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व वरील क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी संबंधित व्यवसाय करत असल्याच्या पुराव्यासह नगर परिषद कार्यालयात नावनोंदणी करावी व अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार यांनी केले आहे.
नगर परिषदेद्वारे केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी करण्याचे कार्य चालू आहे. शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलन करणे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. अभियानाच्या माध्यमातून शहरी गरीब व्यक्तींना उदरनिर्वाहाकरिता विविध घटकांद्वारे साहाय्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर या माहितीचे संकलन केले जात आहे.
फिरता निधी वितरित
डिसेंबरअखेर २२८ बचतगट स्थापन करण्यात आले असून, ११ वस्तीस्तरीय संघ व १ शहरस्तरीय संघ स्थापन करण्यात आला आहे. जवळपास २५१८ महिलांचे संघटन झाले आहे. २१९ प्रत्येकी १० हजार याप्रमाणे २१ लाख ९० हजार रुपयांचा फिरता निधी अभियानांतर्गत वितरित करण्यात आला आहे.