दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्सिजन टाकीची नियमित देखभाल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:10+5:302021-04-23T04:17:10+5:30

नाशिक : झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी सर्व आरोग्य यंत्रणांनी भविष्यात घेणे गरजेचे ...

Regular maintenance of the oxygen tank is essential to prevent accidents | दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्सिजन टाकीची नियमित देखभाल आवश्यक

दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्सिजन टाकीची नियमित देखभाल आवश्यक

Next

नाशिक : झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी सर्व आरोग्य यंत्रणांनी भविष्यात घेणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन टाकीची नियमित दुरुस्ती व देखभाल करावी, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

राज्याकडून जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन्स टप्प्याटप्प्याने मिळणार असून जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील गरजूंना त्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यद्धतीप्रमाणे वितरण करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील दुर्घटनेच्या व गुरुवारी (दि. २२) रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्म येथील आयोजित बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, कोरोना सांख्यिकी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, साहाय्यक संचालक माधुरी पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, ऑक्सिजनचे व्यवस्थापन करताना देखभाल, दुरुस्तीसोबतच ड्युरा व जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचीही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ऑक्सिजन टँक भरण्यासाठी पाठवताना सोबत पोलीस पथकाची सुरक्षा देण्यात यावी. कुठल्याही रुग्णालयात रुग्णांना अत्यावश्यक सेवा, सुविधा, ऑक्सिजन, औषधे कमी पडणार नाहीत याची काळजी सर्व प्रशासनाने घ्यावी. त्याचप्रमाणे मनुष्यबळ वाढविण्यासाठी सेवानिवृत्त, मानवतेच्या भावनेतून स्वतःहून काम करणाऱ्या अनुभवी डॉक्टर्स व परिचारिका यांना प्राधान्य देऊन त्यांची मानधन तत्त्वावर भरती करण्यात यावी, असे महानगरपालिका आयुक्त जाधव यांना पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

इन्फो..

बाधितांबरोबर नातेवाईक आणण्यास मनाई

बाधित रुग्णासोबत आलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढतो व त्यांच्यामार्फत इतरही लोक बाधित होतात. यावर निर्बंध आणण्यासाठी सर्व कोविड रुग्णालयांच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या सोबत त्यांच्या नातेवाइकांना येण्यास सक्त मनाई करण्यात येऊन पोलीस यंत्रणेच्या मदतीने कोविड रुग्णालय परिसरात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही निर्देश पालकमंत्री भुजबळ यांनी या वेळी दिले आहेत.

Web Title: Regular maintenance of the oxygen tank is essential to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.