शंभरी गाठलेल्या आजींचे १९५२ पासून नियमित मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:29 AM2019-04-30T01:29:57+5:302019-04-30T01:30:14+5:30
देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.
नाशिक : देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.२९) झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील गौळाणे येथील वयाची शंभरी गाठलेल्या सखूबाई नामदेव चुंभळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
देशात १९५२ पासून आजपर्यंत झालेल्या सर्व १७ निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान केले आहे. मतदान करणे ही आपली लोकशाही अबाधित राखण्यासाठी सर्वांची जबाबदारी असून, मतदान केल्यानंतर आपण जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा घटक असल्याची अनुभूती म्हणजे सर्वाधिक आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मतदान हा केवळ आपला हक्क म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक असल्यानेच आपण आतापर्यंत कधीही न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सखूबाई चुंभळे यांचा नातू विश्वास चुंभळे सोमवारी सकाळी त्यांना गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर घेऊन आल्यानंतर सखूबार्इंनी आपला मतदानाचा हक्क बजावला.