शासकीय जमिनींवरील अतिक्रमण नियमानुकूल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:14 AM2021-05-09T04:14:52+5:302021-05-09T04:14:52+5:30
येथील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी ...
येथील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, रामा मिस्तरी आदी उपस्थित होते.
शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे हा जुना विषय असल्याचे सांगत मंत्री भुसे म्हणाले, शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयानुसार नियमानुकूल होणाऱ्या प्रकरणांची संख्या तुलनेने कमी आहे. प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लागल्यास सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होऊन पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामातून शासनास मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार असून स्थानिक ग्रामपंचायतींनादेखील उत्पन्नाचे चांगले स्रोत निर्माण होणार आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतंर्गत घरकुल पात्र परंतु जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जागेअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसाठी ५० हजारांपर्यंतचे अर्थसहाय पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना असून वरील निर्देशाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची संख्याही कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वासही भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
इन्फो
वीज वितरणचा आढावा
शहरात वीजपुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीमार्फत वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. वीज ग्राहकही आंदोलनाच्या पवित्र्यात असून याची गंभीर दखल घेत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच शहरासह तालुक्यात सुरळीत वीजपुरवठा होईल याबाबत दक्ष राहून कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.