भाजपाच्या २७ नगरसेवकांचे तीन समित्यांमध्ये पुनर्वसन
By admin | Published: May 12, 2017 01:46 AM2017-05-12T01:46:36+5:302017-05-12T01:46:58+5:30
नाशिक : महापालिकेतील नवनिर्वाचित विशेषत: भाजपाच्या नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी विधी, शहर सुधार, आरोग्य समितीची पुनर्स्थापना करण्याचा मुहूर्त निश्चित झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेतील नवनिर्वाचित विशेषत: भाजपाच्या नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी विधी, शहर सुधार, आरोग्य समितीची पुनर्स्थापना करण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या गुरुवारी (दि.१८) या तीन समित्यांवर नगरसेवक नियुक्त करण्यासाठी महासभेत प्रक्रिया राबविल्या जाणार आहेत.
महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीत अशाप्रकारच्या विषय समित्या होत्या. १९९७ मध्ये प्रभाग समित्या स्थापन करण्याचे राज्यशासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने खर्चाची बचत आणि प्रभाग समित्यांना योग्य पद्धतीने कामकाज करता यावे यासाठी या सर्व विषय समित्या रद्द करण्याचा ठराव महासभेत करून घेतला होता. त्यामुळे पंचवीस वर्षांनंतर आता या समित्या गठीत होत आहेत.
महापालिकेत भाजपाला बहुमत आहे. अशावेळी सर्वच नगरसेवकांना कुठे ना कुठे सत्तापदाची संधी हवी आहे.
त्या पार्श्वभूमीवर पहिल्या पंचवार्षिक कारकिर्दीत असलेल्या शहर सुधार समिती, विधी समिती तसेच वैद्यकीय व आरोग्य समितीची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. समितीच्या गठनाचा प्रस्ताव महासभेने मंजूर केल्यानंतर आता प्रत्यक्ष समितीत सदस्य नियुक्त होणार आहेत.