घंटागाडीच्या ठेक्याला पुन्हा मुदतवाढ
By admin | Published: June 30, 2015 01:24 AM2015-06-30T01:24:01+5:302015-06-30T01:24:37+5:30
घंटागाडीच्या ठेक्याला पुन्हा मुदतवाढ
नाशिक : घंटागाडीच्या ठेक्याला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करत सप्टेंबरपासूनच नव्याने देण्यात येणाऱ्या ठेक्यासाठी निविदाप्रक्रिया राबवावी, असे आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत घंटागाडीच्या ठेक्याला पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही सभापतींनी निक्षूण सांगितले. दरम्यान, अग्निशामक विभागामार्फत सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात येणाऱ्या सुमारे सव्वासहा कोटी रुपये खर्चाच्या रेस्क्यू व्हॅन खरेदीबाबत सदस्यांनी संशय व्यक्त केल्यानंतरही समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली.स्थायी समितीच्या बैठकीत सद्यस्थितीतीलच घंटागाडीच्या ठेक्याला पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता; परंतु या प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच सभापती शिवाजी चुंभळे यांनी घंटागाडीच्या ठेक्याला ही शेवटचीच मुदतवाढ असल्याचे स्पष्ट केले आणि सप्टेंबरपासूनच नव्याने देण्यात येणाऱ्या ठेक्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. स्थायीवर पुन्हा मुदतवाढीचा प्रस्ताव आणताच कामा नये, असा इशाराही सभापतींनी प्रशासनाला दिला. बैठकीत अग्निशामक विभागामार्फत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन रेस्क्यू व्हॅन खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. एका रेस्क्यू व्हॅनच्या प्रस्तावाला विनाचर्चा मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या फ्लड रेस्क्यू व्हॅन खरेदीच्या प्रस्तावावर राहुल दिवे यांनी अग्निशामक दलाचे प्रमुख अनिल महाजन यांना जाब विचारला. व्हॅन खरेदीचे दोन प्रस्ताव वेगवेगळे कसे, या व्हॅनसाठी किती निविदा आल्या आणि किती जादा दराच्या होत्या, अशा प्रश्नांचा मारा दिवे यांनी केला. त्यावर महाजन यांनी सांगितले, दोन रेस्क्यू व्हॅन वेगवेगळ्या उपयोगासाठी असून, त्यासाठी ४२ ते ५४ टक्के जादा दराने निविदा आल्या होत्या, परंतु आयुक्तांनी संबंधित निविदाधारकांशी चर्चा करून आठ जादा दरावर निविदा अंतिम केली. महाजन यांच्या उत्तरानंतर दिवे यांनी आयुक्तांचे अभिनंदन करत यापूर्वी झालेल्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला. आयुक्तांनी रात्री उशिरा बसून ६६ टक्के जादा दराची निविदा आठ टक्क्यांवर आणली. आयुक्तांना जर पूर्ण दिवस मिळाला असता तर कमी दराची निविदा पाहायला मिळाली असती. रेस्क्यू व्हॅन खरेदीबाबत अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्याविषयी दिवे यांनी संशय व्यक्त केला. (प्रतिनिधी)