वास्तववादी चित्रपट नाकारणे दुर्दैवी; अंकुर चित्रपट महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:14 AM2017-11-23T00:14:40+5:302017-11-23T00:18:43+5:30
आपल्या देशातच नव्हेतर जगात वास्तववादी चित्रपट नाकारला जातो. ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही चित्रपट वास्तववादी तर, काही चित्रपट कल्पनाविलासी असतात. वास्तवाधारित चित्रपटांचा आपल्याकडे स्वीकार होत नाही अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केली.
नाशिक : आपल्या देशातच नव्हेतर जगात वास्तववादी चित्रपट नाकारला जातो. ही गोष्ट दुर्दैवी आहे. काही चित्रपट वास्तववादी तर, काही चित्रपट कल्पनाविलासी असतात. वास्तवाधारित चित्रपटांचा आपल्याकडे स्वीकार होत नाही अशी खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कासारवल्ली यांनी व्यक्त केली. येथील अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सहाव्या चित्रपट महोत्सवास बुधवारी शानदार प्रारंभ झाला. येथील कुसुमाग्रज स्मारकात बुधवारी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन राष्टÑीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर संजय सावळे, रघुनाथ फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अभिनव पद्धतीने अनावरण करण्यात आले. कॅमेºयाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करीत महोत्सवाला प्रारंभ झाला. कासारवल्लींच्या ‘इमेजेस अॅँड रिफ्लेक्शन्स’ या चित्रपटाचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले. कासारवल्ली यांनी चित्रपट निर्मितीतील आव्हाने, त्यातून मिळणारा आनंद, चित्रपट निर्मितीत बदलत गेलेली प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चित्रपटप्रेमी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी चित्रपटसृष्टीतील चालू घडामोडींच्या प्रतीकांचे मॉडेल सेल्फी पॉइंट म्हणून उभारण्यात आले असून, प्रेक्षकांचा त्यास प्रतिसाद लाभत आहे. महोत्सवात गुरुवारी (दि. २३) सकाळी १०.३० पासून विविध चित्रपटांचे सादरीकरण करण्यात येणार असून, दुपारी २ वाजता प्रा. हृषिकेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंकुरमधील लघुपट व माहितीपटावर चित्रपट रसग्रहण कार्यशाळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता आर्टिझेन्स या वेबसिरीजचे निर्माते जयेश आपटे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. रात्री ८ वाजता प्रख्यात नृत्यांगना दीपा बक्षी यांच्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण व त्याविषयी प्रेक्षकांशी संवाद होईल. महोत्सवात देशभरातून आलेले विविध सामाजिक विषयांवरील चित्रपट दाखविण्यात येणार असून, रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभिव्यक्तीतर्फे करण्यात आले आहे.