सातपूरला विवाहित शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यूने नातेवाईक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 08:31 PM2020-02-02T20:31:03+5:302020-02-02T20:38:34+5:30
घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती.
नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत अशोकनगरमधील संभाजीनगर भागात राहणाऱ्या एका खासगी शाळेच्या महिला शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२) सकाळी सुमारे पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पालिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असता माहेरवाशिण मयत महिलेच्या नातेवाईकांना संताप व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरले.
अशोकनगर भागात राहणा-या शहरातील एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणा-या तेजस्विनी राकेश भामरे (२६) या महिलेचा सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. राहत्या घराच्या वरच्या खोलीत भामरे खासगी शिकवणी वर्ग घेत होत्या. शिकवणी वर्ग सुटल्यानंतर काही वेळानंतर त्यांचा मृतदेह त्या घराच्या छताच्या पंख्याच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीवर उतरवून पंचनामा करत तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविला, कारण यावेळी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. दरम्यान, भामरे यांच्या माहेरचे नातेवाईक रूग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी ‘माहेरचे लोक येण्यापुर्वी मृतदेह जिल्हा रूग्णालयात का आणला’ असा जाब विचारत पोलिसांना धारेवर धरले. यावेळी जमलेल्या माहेरच्या लोकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला तसेच जोपर्यंत तेजस्विनीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सासरच्या मंडळींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याची भूमिका नातेवाईक महिला, पुरूषांनी घेतली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राकेश हांडे व सातपूर पोलिसांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात धाव घेत संतप्त झालेल्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नातेवाईकांची आक्रमक भूमिका कायम होती.
‘दोषींवर निश्चित कायदेशीर कारवाई’
सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. सुमारे वीस मिनिटे सुर्यवंशी यांनी मयत तेजस्विनी यांचे भाऊ, बहीण, आई व अन्य नातेवाईकांची समजूत काढत ‘दोषी आढळणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही, तुम्हाला सासरच्या ज्या व्यक्तींविरूध्द संशय वाटत असेल, त्यांच्याविरूध्द तक्रार द्या, पोलीस तपास करून संशयितांविरूध्द कायदेशीर कारवाई, करतील याची खात्री बाळगा’ असे आश्वासन त्यांनी विश्वासात घेत दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांचा रोष कमी झाला. पोलीस बंदोबस्तात शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली तसेच अंत्यविधीच्यावेळीही सातपूर पोलीस कर्मचारी अमरधाममध्ये तैनात करण्याचे आदेश
यावेळी सुर्यवंशी यांनी हांडे यांना दिले. शवविच्छेदनानंतर संध्याकाळी माहेरच्या लोकांनी तेजस्विनी यांचा मृतदेह ताब्यात घेतला.