मालेगावी ५ वृद्ध रुग्णांकडे नातेवाईकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:45+5:302021-04-30T04:17:45+5:30
येथील सामान्य रुग्णालयात सध्या १०८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले रुग्णांसाठी परिश्रम ...
येथील सामान्य रुग्णालयात सध्या १०८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हितेश महाले रुग्णांसाठी परिश्रम घेत आहेत. यामुळे कसमादे परिसरातील रुग्ण मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत १५ दिवसांपूर्वी ५ वृद्ध कोरोनाबाधित आढळून आले होते. डॉ. महाले व त्यांच्या पथकाने या रुग्णांवर उपचार केेले. त्यांची प्रकृती आता ठणठणीत आहे. त्यांच्या नातलगांना प्रकृती चांगली असून रूग्णांना घरी घेऊन जावे, असा निरोप देऊन देखील रुग्णांच्या नातेवाईकांनी या वृद्ध नागरिकांकडे पाठ फिरविली आहे. या वृद्ध नागरिकांची रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून काळजी घेतली जात आहे. दोन वेळचे जेवण व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. पोलीस यंत्रणेकडे याबाबत पत्र व्यवहार करुन रुग्णांच्या नातेवाईकांना बोलवून त्यांच्याकडे वृद्धांना सोपविले जाणार असल्याची माहिती डॉ. महाले यांनी दिली.
इन्फो...
सध्या मालेगाव सामान्य रुग्णालयात १०८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यात महापालिका क्षेत्रातील ३५, तालुक्यातील ३४, सटाणा १०, चांदवड ५, मनमाड २, नांदगाव ३, देवळा ४ व जिल्ह्याबाहेरील ९ रुग्णांचा समावेश आहे.