शिथिलता समाधानाचीच, पण सावधानता सोडू नये!

By किरण अग्रवाल | Published: April 26, 2020 12:08 AM2020-04-26T00:08:40+5:302020-04-26T00:13:35+5:30

सारांश अन्य ठिकाणच्या तुलनेत नाशकातील कोरोनाबाबतची स्थिती काहीशी आटोक्यात आहे हे खरेच, परंतु म्हणून जनजीवन पूर्वपदावर आल्यासारखे वागणे उचित ...

Relaxation is satisfaction, but caution should not be given up! | शिथिलता समाधानाचीच, पण सावधानता सोडू नये!

शिथिलता समाधानाचीच, पण सावधानता सोडू नये!

Next
ठळक मुद्देअटी-शर्तींवर काही व्यवसायांना परवानगी, मात्र फिजिकल डिस्टन्सिंग गरजेचेच;पोलिसांचे संचलन म्हणजे स्वागतयात्रा नव्हेत !

सारांश
अन्य ठिकाणच्या तुलनेत नाशकातील कोरोनाबाबतची स्थिती काहीशी आटोक्यात आहे हे खरेच, परंतु म्हणून जनजीवन पूर्वपदावर आल्यासारखे वागणे उचित ठरू नये़ सावधानतेसोबत कायद्याचा धाक कायम ठेवल्याखेरीज कोरोनाचे संकट दूर ठेवता येणार नाही हे नागरिकांनी व यंत्रणांनीही लक्षात घेणे गरजेचे आहे़

किरण अग्रवाल।
राज्याच्या अन्य महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा कहर पाहता नाशिक महानगर बऱ्यापैकी बचावले आहे, त्यामुळे येथील लॉकडाउनच्या स्थितीत काहीशी शिथिलताही आलेली आहे, पण म्हणून धोक्याच्या शक्यतांना पूर्णत: नाकारता येऊ नये.

नाशिक लगतच्या मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, चिंचवड, औरंगाबाद यांसह अन्य नागपूर आदी व जिल्ह्यातीलही मालेगाव महापालिका क्षेत्रात कोरोनाने उडविलेला हाहाकार सर्वांच्याच मनाची घालमेल वाढविणारा ठरला आहे. विशेषत: नाशिक तर मुंबई, पुणे व औरंगाबादच्या चतुष्कोनात गणले जाते. या तीनही जिल्ह्यांचा नाशिकशी निकटचा संबंध असल्याने यातील दळणवळण सदोदित सुरू असते, त्यामुळे या तीनही जिल्ह्यांतील कोरोनासंबंधित स्थिती लक्षात घेता नाशिकचा धोका वाढून गेला होता; परंतु अशाही स्थितीत नाशिकमधील प्रशासनाने ज्या प्रभावीपणे उपाययोजना राबवून व प्रारंभापासूनच लॉकडाउन सक्तीचे करून काळजी घेतली त्यामुळे नाशिक महानगर तुलनेने बचावलेले दिसत आहे. यासाठी राबत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा रुग्णालय व पोलीस आदी साºया यंत्रणांना सॅल्यूट करायलाच हवा.

नाशकात आजवर ११ कोरोनाबाधित आढळले असून, त्यातही काही महापालिका क्षेत्राबाहेरचे आहेत. एकाला तर उपचाराअंती घरीही सोडण्यात आले आहे. जसे जसे रुग्ण आढळले तसे तसे व त्या त्या परिसराला तत्काळ सील करून काळजी घेतल्यानेच नाशकातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आले. इतरत्र याकाळात बाधितांची संख्या वेगाने वाढत असताना नाशकात गेल्या ५/६ दिवसात एकही नवीन रुग्ण निष्पन्न झाला नाही. त्यामुळे लॉकडाउन काहीसे शिथिल होताना दिसत आहे. वस्तुत: ३ मे पर्यंत ते वाढविले असतानाही रस्त्यावरील वाहने व बाजारातील गर्दी वाढताना दिसत आहे. ते धोक्याचेच असले तरी त्याकडे दुर्लक्षच होत आहे. तेव्हा असे होऊ देण्याऐवजी वॉर्डातील नगरसेवक व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले तर अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर पडणाºया नागरिकांवर यापुढील काळात लक्ष ठेवता येऊ शकेल.

महत्त्वाचे म्हणजे अटी-शर्तींना बांधील राहून नाशकातील सुमारे ८५० लहान व मध्यम उद्योगधंदे सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे, तर बांधकाम क्षेत्रातील अडकून पडलेल्या मजुरांची अडचण लक्षात घेता सुमारे पन्नासेक प्रकल्पांनाही कामकाजाची परवानगी देण्यात आली आहे. अर्थचक्र सुरळीत व्हावे असा हेतू त्यामागे आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठ्याची व पावसाळापूर्व कामांची सुरुवातही करण्यात आली आहे. एकूणच ही शिथिलता समाधानकारक, दिलासादायक व सुस्कारा सोडण्यालायक असली तरी कोरोनाचा धोका कमी झाला आहे असे म्हणून त्याकडे पाहता येऊ नये. कोरोनाबाबतची सावधानता यापुढील काळातही गरजेचीच असल्याचे दुर्लक्षता येऊ नये. दुर्दैवाने तसे दुर्लक्ष घडून येत असल्याचे दिसून येत आहे, हे अधिक गंभीर म्हणावयास हवे.

आपत्तीत संधी शोधणे हे ठीक, परंतु आपल्याकडे आपत्तीचेही उत्सवीकरण केले जाते हे या संदर्भाने आश्चर्यजनक म्हणावयास हवे. कोरोनाच्या संदर्भात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शासनाने लॉकडाउन कायम ठेवले असले तरी नागरिकांकडून त्याचे पालन पुरेशा प्रमाणात होत नाही म्हणून पोलिसांकडून त्याबाबतची जाणीव करून देण्यासाठी काही ठिकाणी संचलन केले जात आहे. या संचलनामागे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना संकेत देण्याचा हेतू आहे, परंतु कोरोना काळात केल्या जात असलेल्या पोलीस संचलनात नागरिकांकडून पुष्पवृष्टी केली जाताना व ढोल बडवले जाताना दिसून आलेत. या काळात पोलिसांकडून बजावल्या गेलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हायलाच हवे व ते होतही आहे, परंतु परिस्थितीचे गांभीर्य न बाळगता होत असलेल्या प्रकारांकडे कौतुकाने पाहता येऊ नये़ कारण अशातून आपत्तीचे गांभीर्यच हरविण्याचा धोका आहे़ पोलिसांचे हे संचलन म्हणजे नववर्षाच्या स्वागतयात्रा नव्हेत़ तेव्हा यासंदर्भात नागरिक व यंत्रणांनीही भान बाळगणे अतिशय गरजेचे आहे. क्षणिक किंवा तत्कालिक दिलासादायक स्थितीने भारावून न जाता दूरदृष्टीने संकटांची जाणीव ठेवली तर असे प्रकार होणार नाहीत एवढेच तूर्त यानिमित्ताने.

Web Title: Relaxation is satisfaction, but caution should not be given up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.