अकरा तासांनंतर सुटका : कादवा, वडाळी नद्यांचा पूर ओसरला
By Admin | Published: September 19, 2015 11:14 PM2015-09-19T23:14:19+5:302015-09-19T23:14:51+5:30
.आणि ते सुखरूप परतले
निफाड : परिसरात शुक्रवारी दिवसभर झालेल्या धुवाधार पावसामुळे कादवा व वडाळी नद्यांना आलेल्या पुराच्या वेढय़ाने निफाड येथील संगमेश्वर मंदिर येथे अडकलेले निफाड येथील नऊ जण शनिवारी सकाळी या पुराचे पाणी ओसरल्यानंतर तब्बल ११ तासानंतर सुखरूप बाहेर आले.
येथील पुंडलीक शंकर राऊत यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम शनिवारी सकाळी कादवा-वडाळी नदीच्या संगमावरील संगमेश्वर मंदिर येथे होणार होता. त्या दशक्रिया विधीसाठी स्वयंपाक करायचा असल्याने शुक्रवारी सायंकाळी प्रवीण पुंडलीक राऊत, किरण पुंडलीक राऊत, रमेशआप्पा राऊत, प्रवीण दशरथ बोराडे, राजेंद्र केदारे, स्वयंपाक करणारे दिगंबर, स्वयंपाकीबरोबर एक मुलगा व मदतीसाठी असणार्या दोन महिला असे नऊ जण संगमेश्वर मंदिराशेजारील उंचवट्यावरील सभागृहात गेले होते. मात्र शुक्रवारी दिवसभर मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने ते सर्वजण सभागृहातच अडकले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याच्यांतील काही सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले तर संपूर्ण संगमेश्वर मंदीराला पुराचा विळखा पडला होता. तसेच ज्या पुलावरून हे सर्वजण मंदिराकडे आले तो पूलही पुरामुळे तुटून पडला होता. या सभागृहाच्या उत्तर बाजूने विनता नदीच्या बाजूने असलेला बंधारा पुराच्या पाण्याखाली गेलेला होता. आपण सर्वजण पुराच्या पाण्याचा वेढय़ात अडकलो आहोत. याची जाणीव त्यांना झाली. यातील एकदोन जणांनी आपण हिमतीने जाऊ म्हणून निघण्याचा प्रयत्न केला मात्र रमेश राऊत यांनी त्यांना जाऊ दिले नाही उलट धीर दिला.
अडकलेल्यापैकी एक दोन जणांनी निफाडमधील मित्रपरिवाराला आम्ही संगमेश्वर मंदिराशेजारील सभागृहात अडकलो असल्याचे कळविल्यानंतर मित्रपरिवाराने तात्काळ तहसील व पोलीस प्रशासनाला कळवले. त्यानंतर तहसीलदार डॉ. संदीप अहेर, नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे, नायब तहसीलदार पवार, निरगुडे, निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट त्यांचे पोलीस पथक कादवा नदीकिनारी रात्रीच हजर झाले. वेळ रात्रीची व पुराचे पाणी भरपूर असल्याने अडकलेल्या ९ सदस्यांना नदीकिनारी आणणे अवघड होते. प्रांत. शशिकांत मंगरुळे यांनी जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधून तातडीने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक निफाडला पाठवण्याची विनंती केली.
रात्री एकच्या दरम्यान हे पथक कादवा नदीकिनारी दाखल झाले. परंतु पुराच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने रात्री होडी टाकणे जिकरीचे आणि अवघड बनले होते. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला बचावकार्य थांबवावे लागले.
दरम्यान, पुराचे पाणी हळुहळु ओसरायला लागल्याने पहाटेपर्यंत वाट बघून प्रयत्न करण्याचे ठरले. सभागृह कादवा विनतेच्या संगमावर मध्यभागी उंचावर होते. या सभागृहाशेजारी उंच भाग असल्याने या ९ जणांना ही गोष्ट दिलासा देणारी होती. पुराचे पाणी ओसरू लागल्याने सर्वांना धीर आला होता.
शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास पुराचे पाणी ओसरल्याने पावणेसात वाजता सर्व ९ जण सभागृहाशेजारी बंधार्यावरून चालत सुखरूपपणे नदीकिनारी आले. तेव्हा नायब तहसिलदार साहेबराव सोनवणे, प्रशासकीय अधिकारी, तलाठी निफाडे, राऊत कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.
संगमेश्वर मंदिरात कायम दर्शनासाठी येतो. त्यामुळे मंदिर व सभागृहाजवळच्या उंचीचा अंदाज असल्याने व जवळ छोटी टेकडी असल्याने आपण सर्व सुखरूप राहू, असा धीर सोबतच्या सर्वांना दिला. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, मित्रपरिवार रात्री आम्हाला मोबाइलद्वारे धीर देत होते. हा प्रसंग आम्ही सर्वजण कधीच विसरू शकत नाही. - रमेश राऊत