खड्ड्यात पडलेल्या बैलाची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:35 PM2020-04-29T22:35:06+5:302020-04-29T23:30:22+5:30
नाशिक : वडाळा शिवारातील खोडेनगर येथील एका खासगी बांधकाम प्रकल्पाच्या खड्ड्यात बुधवारी (दि.२९) दुपारी एक बैल अनवधानाने पडला.
नाशिक : वडाळा शिवारातील खोडेनगर येथील एका खासगी बांधकाम प्रकल्पाच्या खड्ड्यात बुधवारी (दि.२९) दुपारी एक बैल अनवधानाने पडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व प्राणिप्रेमी घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या ते एक तासाच्या प्रयत्नांनंतर बैलाला बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने बैलाला कोणतीही इजा झालेली नाही.
वडाळा गावातील खोडेनगर शिवारात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत असल्याने यापूर्वीदेखील दुर्घटना घडली आहे. संत सावता माळी रस्त्याला लागून खोडेनगरच्या रस्त्याजवळ एक बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी पाया खोल खोदण्यात आला आहे.
माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच इको इको या वन्यजीव संस्थेचे स्वयंसेवक, विठ्ठल रुखमाई ट्रस्टचे सुनील माधव खोडे, माजी नगरसेवक सुनील खोडे हेदेखील पोहचले. यावेळी प्राणिप्रेमी व जवानांनी परिश्रम घेत बैलाला बाहेर काढले. दरम्यान, अशाप्रकारे बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्याची गरज असून, भविष्यात होणारे अपघात टाळावे, अशी मागणी सुनील खोडे यांनी केली आहे. सुदैवाने मुक्या जिवाचे प्राण वाचले तसेच लहान मुलेदेखील पडण्याचा धोका संभवतो त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.