अर्जुनसागर, चणकापूरमधून सोडले आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 06:41 PM2021-04-05T18:41:05+5:302021-04-05T18:41:38+5:30
कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात आले अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता वैशाली ठाकरे यांनी दिली.दरम्यान कळवण, देवळा, सटाणा सह मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिन्याभरापासून बहुसंख्य गावातील विहिरींनी गाठलेला तळ यामुळे परिसरातील पाणीयोजना कोरड्या पडल्या असून अर्जुनसागर (पुनद) व चणकापूरच्या या आवर्तनाने पाणी योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे. कसमादे परिसरातून पाण्याची वाढलेली मागणी व पदाधिकारी आणि नागरिकांनी आमदार नितीन पवार यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.
आमदार पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी टंचाई लक्षात आणून देत कसमादेतील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन अर्जुनसागर धरणात शिल्लक असलेल्या ९५० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात सोडावे व चणकापूर धरणात शिल्लक असलेल्या १४५० दशलक्ष घनफूट साठ्यापैकी या आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात ८ ते १० दिवसात ११०० क्युसेसने ४५० दशलक्ष घनफूट पाणी सोडावे अशी मागणी आमदार नितीन पवार यांनी केल्याने जिल्हाधिकारी यांनी अर्जुनसागर व चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले.
ऊन वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत कमी झाले आहे. त्यामुळे कसमादेच्या चारही तालुक्यांना अर्जुनसागर व चणकापूर धरणाच्या आवर्तनाच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. यामुळे यावर्षी पाण्याला अनन्यसाधारण महत्व आले असून पाणी आवर्तन सुरू असेपर्यंत अवैध वीजपंप चालवून कुणी पाणी उपसा करू नये म्हणून नदीकाठच्या या गावांमध्ये ८ ते १० तास भारनियमन करण्यात येणार आहे.