मांजापासून केली टिटवीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:22 PM2018-12-20T17:22:09+5:302018-12-20T17:22:47+5:30
पाय व पंखांमध्ये मांजा अडकल्यामुळे दुखापत
पिंपळगाव बसवंत : परिसरातील जऊळके वणी येथे पतंगाच्या मांजामध्ये झाडावर अडकून पडलेल्या लॅपविन्ग अर्थात टिटवी पक्ष्याची मांजापासून सुटका करून एका शेतकऱ्याने जीवदान दिले. दरम्यान, नॉयलॉन मांज्यावर बंदी आणण्याची मागणी परिसरातून होत आहे.
लॅपविंग(टिटवी) या जातीचा पक्षी सूर्यभान पाटील यांना आपल्या शेतात झाडावर अडकलेला दिसला. त्यांनी लगेचच त्या पक्षाला झाडावरून हळुवार खाली आणले. त्याच्या पाय व पंखांमध्ये मांजा अडकल्यामुळे त्याला दुखापत झाली होती. पाटील यांनी त्या पक्षाला मांजापासून मुक्त करून घरी आणले. त्याच्या जखमेला प्राथमिक उपचार करून पाणी पाजले. मांजामुळे जखमी झालेल्या त्या पक्षाला दोन तीन दिवस उपचार करून पुन्हा शेतात सोडून देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती त्यांनी ग्रामपंचायतलाही दिली असून पतंगाच्या मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले असून त्यावर बंदी घालण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.