कडाक्याच्या थंडीपासून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:11 AM2020-12-27T04:11:41+5:302020-12-27T04:11:41+5:30
मागील रविवारपासून शहराचे कमाल व किमान तापमनात घसरण होण्यास सुरुवात झाली होती. उत्तरेकडील शीतलहरी राज्यात आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे ...
मागील रविवारपासून शहराचे कमाल व किमान तापमनात घसरण होण्यास सुरुवात झाली होती. उत्तरेकडील शीतलहरी राज्यात आल्याने शहराच्या वातावरणात अचानकपणे गारठा वाढला होता. उत्तर महाराष्ट्रातही थंड वाऱ्यांचा वेग वाढला होता. थंडीचा कडाका वाढताच ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नाशिककरांची लगबग बाजारपेठेत पाहावयास मिळाली. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ऊबदार कपडे खरेदीवर भर दिला गेला; मात्र चार दिवसांतच शहरातून थंडी पुन्हा गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना रविवारी आला. गेल्या सोमवारपासून (दि.२१) शहराचा पारा वेगाने घसरण्यास सुरुवात झाली. सोमवारी ९.१ अंशापर्यंत तर मंगळवारी पारा थेट ८.४ आणि बुधवारी ८.२ इतके या हंगामातील सर्वात नीचांकी तापमान नोंदविले गेले. आठवडाभर नागरिकांनी थंडीचा कडाका अनुभवला; मात्र शुक्रवारपासून थंडीची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागली. शनिवारी मात्र कमाल तापमानाचा पारा ३१.२अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला. वातावरणात दिवसभर काही प्रमाणात उष्माही जाणवला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे पुन्हा जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.