उष्म्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:24 AM2018-05-01T01:24:45+5:302018-05-01T01:24:45+5:30
शहराच्या वाढत्या तपमानामुळे उकाड्याने नाशिककर मागील चार दिवसांपासून हैराण झाले होते. सोमवारी (दि.३०) तपमानाचा पारा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्याने पारा घसरला. तीन दिवसांपूर्वी तपमानाचा पारा थेट चाळीशीच्या पुढे सरकला होता.
नाशिक : शहराच्या वाढत्या तपमानामुळे उकाड्याने नाशिककर मागील चार दिवसांपासून हैराण झाले होते. सोमवारी (दि.३०) तपमानाचा पारा काहीसा कमी झाल्याने दिलासा मिळाला. सकाळपासून दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्याने पारा घसरला. तीन दिवसांपूर्वी तपमानाचा पारा थेट चाळीशीच्या पुढे सरकला होता. हंगामातील उच्चांकी ४०.५ इतक्या तपमानाची नोंद शुक्रवारी (दि.२७) पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात करण्यात आली. चार दिवसांमध्ये तपमानाचा पारा एक अंशाने कमी होत सोमवारी ३७.६ अंशांपर्यंत घसरला. आकाश निरभ्र असतानाही वारा अधिक वेगाने वाहू लागल्याने तपमान कमी झाले व वातावरणातील वाढलेल्या उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. सोमवारी दिवसभर वारा वेगाने वाहत असल्याने उन्हाचा चटकाही कमी प्रमाणात जाणवत होता. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वर्दळही दिवसभर दिसून आली. मागील तीन दिवसांपासून नाशिककर जणू भट्टीत भाजून निघाल्याचा अनुभव घेत होते. प्रखर ऊन आणि मंद झालेला वारा व निरभ्र आकाश असे चित्र असल्याने तपमानात वाढ झाली होती. उन्हाच्या वाढत्या झळांनी जिवाची काहिली होत होती.