पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:50 PM2020-08-14T12:50:51+5:302020-08-14T12:51:49+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रूपाली, एक हजार आठ अशा नामवंत भाताच्या वाणांच्या रोपांची पेरणी केली. या सोबतच उडीद, सोयाबीन, भुईमूग, खुरासणी आदी पिकांसोबत शेतकºयांनी बागायती भाजीपाला पिकांची जोरात लागवड केली होती; परंतु जूनच्या सुरु वातीलाच वरुणराजाने दमदार हजेरी लावल्यानंतर आजपर्यंत पाऊसच पडला नाही, या कारणास्तव तालुक्यातील शेतकरी राजा हवालदिल झाला. अनेक शेतकºयांची जून, जुलै, आॅगस्टपर्यंत केवळ पावसाच्या पाण्यावाचून भाताची रोपे कडाक्याच्या उन्हामुळे पिवळी झाली व अनेकांच्या भाताच्या रोपांचे नुकसानही झाले, तसेच अनेक शेतकºयांनी शेतात पिकांसाठी भरमसाठ खर्च करूनही त्यांना केवळ पावसाच्या पाण्यावाचून आजपर्यंत भात लागवड करता आली नाही. मात्र इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरातील भाताची लागवड अद्यापही झालेली नव्हती. शेतकºयाला तब्बल तीन महिने पावसाची प्रतीक्षा करावी लागली. टाकेद परिसरातील अनेक गावातील शेतकरी, वारकºयांनी चक्क पाऊस पडावा म्हणून दिंडी काढून हरिनामाचा जयघोष करीत टाकेद येथील सर्वतीर्थावर जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांना साकडेदेखील घातले होते. दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली अन् भात लागवडीसाठी शेतकºयांची तारांबळ उडाली. बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीपासून टाकेद परिसरात बरसत राहिलेल्या मुसळधार पावसाने दमदार सुरु वात केल्याने इगतपुरीसह टाकेद परिसरातील नद्या, नाले, ओहळ वाहायला सुरु वात झाली आहे.