बाजार समितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:17 AM2021-05-25T04:17:04+5:302021-05-25T04:17:04+5:30
पार्सल सेवेला पुरेसे ग्राहक नाहीत नाशिक : लॉकडाऊनमुळे शहरातील काही हॉटेलांनी पार्सल व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, त्यांनाही दिवसभर ...
पार्सल सेवेला पुरेसे ग्राहक नाहीत
नाशिक : लॉकडाऊनमुळे शहरातील काही हॉटेलांनी पार्सल व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, त्यांनाही दिवसभर पुरेसे ग्राहक मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे पार्सल पोहोचविणाऱ्या मुलांनाही दिवसभराचा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. काही जण दिवसभर लॉगीन असूनही त्यांना बुकींग मिळत नाही. काही नागरिक स्वत: जाऊन पार्सल घेणे पसंत करतात.
किरकोळ विक्रेत्यांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी
नाशिक : बाजार समित्यांमध्ये अद्याप किरकोळ व्यवहारांना परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे किरकोळ स्वरुपात भाजीपाला खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजार समितीच्या बाहेरच काही विक्रेते शेतकऱ्यांकडून माल खरेदी करताना दिसतात. या व्यवहारात काही वेळा शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घरपोहोच सेवेला वेळेचे बंधन नको
नाशिक : लॉकडाऊनमध्ये जे किराणा व्यापारी घरपोहोच सेवा देत आहेत त्यांना वेळेचे बंधन ठेवू नये अशी मागणी करण्यात येत आहे. घरपाेहोच सेवा देत असल्यामुळे या व्यापाऱ्यांच्या दुकानात गर्दी होण्याचा प्रश्नच नाही. तरीही शासनाने या विक्रेत्यांना सकाळी ११ ची वेळ देण्यात आली आहे. यामुळे या विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
घरेलू कामगार महिलांकडून रोजगाराचा शोध
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात अनेक महिलांना घरच्या घरी स्वयंपाकाचे काम मिळाले होते. यामुळे या महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला होता. आता रुग्ण संख्या कमी झाल्याने या महिलांचे कामही कमी झाले असून या महिला पुन्हा आपल्या जुन्या रोजगाराच्या शोधात बाहेर पडल्या असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी नागरिक अद्याप या महिलांना रोजगार देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.
शीतपेय विक्रेते पुन्हा अडचणीत
नाशिक : गतवर्षाप्रमाणेच याहीवर्षी ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन सुरु असल्याने जिल्ह्यातील शीतपेय विक्रेत्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. यावर्षीही सिझन बुडाल्याची चर्चा होत आहे. अनेक विक्रेत्यांना दुकानाचे भाडे आणि लाईट बिल भरणेही कठीण जात आहे. काहींना तर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.