तुरळक सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:05 AM2021-07-11T00:05:03+5:302021-07-11T00:05:54+5:30

देवगांव : अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. त्यामुळे भातपिकांना ...

Relief for farmers due to sparse rains | तुरळक सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा

देवगांव परिसरात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने भातपिकांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे.

Next
ठळक मुद्देभातपिकांना संजीवनी : देवगाव परिसरात समाधान




देवगांव : अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने गुरुवार आणि शुक्रवारी परिसरातील काही गावांमध्ये तुरळक सरींसह हजेरी लावली. त्यामुळे भातपिकांना ओलावा मिळून नवसंजीवनी मिळणार असल्याने, चिंतेत असलेल्या बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यासह दक्षिण भागातील शेतकरी बांधवांनी जूनच्या पहिला आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणी केली होती. मात्र, काही रोपे माळरानावर असल्याने त्यांना नियमित पावसाची गरज असते. पंधरा दिवसांपासून देवगांव परिसरातील गावांमध्ये सर्वत्र कडक उन्हाने कहर केला होता. त्यामुळे उन्हामुळे पेरलेली रोपेही करपू लागली होती. पंधरा दिवसांत पावसाचा एकही थेंब न पडल्याने लावलेली रोपे ओलाव्याअभावी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने, देवगांव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र दिसत आहे. पावसाच्या सरींमुळे ही पिके आता पुन्हा तग धरतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जर दोन-तीन दिवस पाऊस असाच कोसळत राहिला, तर उर्वरित शेतकऱ्यांची उरलेली कामे लवकर मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

- गत दोन वर्षे अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, तर त्या आधीच्या वर्षी अखेरच्या वेळी पाऊस न पडल्याने भातपिके करपून गेली होती, तर या वर्षी भात लागवडीसाठी रोपे तयार झाली असतानाही वेळेवरच पाऊस गायब झाल्याने मोठे संकट निर्माण होते.

- वेळेत भातलावणी न झाल्यास पिकावर परिणाम होतो. भातांची दिवस मर्यादा असल्याने, काही भातपिके ९०, ११० हलवार तर काही १२०, १३५-४० गरवी पिके, यामुळे जर अधिक कालावधी रोपट्यात गेल्यास, त्याची उमेद तेथेच जाते. त्यामुळे शेतात लागवड केली, तरी नंतर त्याची वाढ होत नाही. परिणामी, दाणा पोसला जात नाही.

पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने भातपिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुसलेल्या पावसाचे आगमन झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला. दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने भातपिकांमध्ये ओलावा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
- अविनाश झोले, शेतकरी, टाकेदेवगाव.

Web Title: Relief for farmers due to sparse rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.