नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:07 PM2020-04-23T22:07:50+5:302020-04-24T00:16:01+5:30
नाशिक : शहरात एकापाठोपाठ एक असे आठ कोरोनाबाधित आढळल्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे महापालिकेला एकीकडे दिलासा मिळत असला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत.
नाशिक : शहरात एकापाठोपाठ एक असे आठ कोरोनाबाधित आढळल्यानंतर गेल्या पाच दिवसांत नवीन बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे महापालिकेला एकीकडे दिलासा मिळत असला सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि. २३) महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पंधरा संशयितांना दाखल करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात कोरोना संसर्गाचा उपसर्ग वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यात आणि नाशिक शहरातदेखील संचारबंदीचे पालन अत्यंत कडकपणे करण्यात आले असल्याने बाधित रुग्ण आढळत नव्हते. मात्र, नंतर गोविंदनगर येथे एक नागरिक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऐकेक करीत संख्या वाढत गेली. आत्तापर्यंत शहरात दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ज्या गोविंदनगर, बंजरंगवाडी, नाशिकरोड, संजीवनगर, नवश्या गणपती परिसरात रुग्ण आढळले आहे. तेथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. त्याठिकाणी पाचशे मीटर ते तीन किलोमीटर परिघातील क्षेत्र सील करण्यात आले आहेत आणि तेथे घर सर्वेक्षण करण्यात आले. गोविंदनगर भाग वगळता अन्य भागांत ही तपासणी सुरूच आहे. नागरिकांचे घर सर्वेक्षण करून गुरुवारी (दि. २३) ३ हजार ५५९ घरांमधील १३ हजार ८३८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातदेखील प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणेच आढळत आहेत. गुरुवारी (दि.२३) सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असलेले १५ संशयित दाखल झाले असून, त्यांचे घसास्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अर्थात, गेल्या दोन दिवसांपासून या भागात एकही नवीन संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
---------
‘त्या’ चाळीस अहवालांची प्रतीक्षा
महापालिका क्षेत्रात प्रथम बाधित रुग्ण आढळल्यानंतरच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अत्यंत काटेकोरपणे आरोग्य नियमांची अंमलबजावणी सुरू केली. आतापर्यंत ४८५ संशयित रुग्णांचे घसास्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी दहाजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला, तर ४३३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ४० अहवाल प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खऱ्या अर्थाने मनपाला दिलासा मिळू शकणार आहे.