चणकापूर कालव्याला पूरपाणी सोडल्यामुळे देवळा तालुक्यातील जनतेला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 07:50 PM2019-07-30T19:50:25+5:302019-07-30T19:51:02+5:30
देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.
देवळा : देवळा तालुक्यात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील जनतेला पुन्हा चणकापुर उजव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी चणकापूर धरणातून चणकापूर उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरण ४८ टक्के भरले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावलेली असली तरी देवळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या-नाले अद्याप कोरडेच आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रिमझीम पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे. मागील आठवड्यात चणकापुर धरणाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.
दरवर्षी रामेश्वर धरण (७८.१४ द.ल.घ.फू) पूरपाण्याने भरल्यानंतर पुढे उजव्या वाढीव कालाव्याला पाणी सोडून पूर्व भागातील लहान मोठे साठवण बंधारे भरण्याचे नियोजन दरवर्षी करावे लागते. यामुळे शेती सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटण्यास मदत होते. पाणी सोडल्यानंतर मात्र लाभक्षेत्रातील ह्या गावांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.
गतवर्षी या ग्रामस्थांच्या बैठका घेऊन कालव्याला सोडलेल्या पाण्याचे वाटप करण्यासाठी गावागावातील वादविवाद टाळत नियोजनपूर्वक तोडगे काढले होते. पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत पाण्याची गळती रोखत पुरपाण्याच्या वितरणात महत्वाची भूमिका बजावली होती.
डिसेंबर महिन्यात लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करून वहन क्षमता वाढविण्यात आली. त्याचा ह्या वर्षी लाभ होईल. चालू वर्षी वाढीव कालव्याला पाणी सोडल्यानंतर पूर्व भागातील लाभक्षेत्रात येणार्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींना परीश्रम घ्यावे लागणार आहेत.
अंदाजपत्रकाप्रमाणे चणकापूर उजव्या कालव्याची चणकापूर येथे सुरवातीची वहन क्षमता १८४.१९ क्युसेक्स असून रामेश्वर येथे शेवटी ती ७५ क्युसेक्स आहे. कालव्याच्या सदोष कामामुळे १२० क्युसेक्सपेक्षा अधिक क्षमतेने कालव्याच्या निर्मितीपासून एकदाही पाणी सोडता आलेले नाही. तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता हे पाणी अपुरे पडत आहे.