राज्यातील गरिबांना शिवभोजन केंद्रांमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:26+5:302021-07-11T04:11:26+5:30
मालेगाव : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला दिलासा मिळत आहे, असे प्रतिपादन ...
मालेगाव : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला दिलासा मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
रावळगाव नाका, कॅम्प परिसरातील सोमवार बाजारातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, राजाराम जाधव, नगरसेवक भीमा भडांगे, राजेश गंगावणे, संजय दुसाणे, रामा मिस्तरी, किरण छाजेड, पिंटू कर्नावट, दीपक मेहता, हरी निकम, विशाल पाटील, प्रमोद पाटील, चैत्राम पवार, दीपक भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी भुसे म्हणाले, निर्धारित थाळ्यांपेक्षा अधिकांना लाभ देऊन पुण्याचे काम शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून घडत आहे. गोरगरिबांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत लाभ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून देण्यात येतो. गुरुराम शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या या शिवभोजन केंद्रामार्फत शासनाने १०० थाळ्या निर्धारित केल्या असल्या तरी, या केंद्रावर दरदिवसाला २०० ते २५० थाळ्यांचे वितरण करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून एकही नागरिक उपाशी राहणार नाही, असे नियोजन केल्यामुळे ते निश्चितच कौतुकास पात्र असल्याचेही भुसे यांनी यावेळी नमूद केले. मुंगसे बाजार समितीमार्फतही येणाऱ्या शेतकऱ्यांना अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याचे काम अविरतपणे सुरू असून या सेवाभावी उपक्रमास सहयोग देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मंत्री भुसे यांनी आभार मानले.