कोरोना टेस्टचे दर कमी झाल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:44+5:302021-04-02T04:14:44+5:30
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दररोज शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्येही केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दररोज शासकीय रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयांमध्येही केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या शुल्कात कपात करुन ते ५०० रुपयांवर आणल्याने सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नाशिकच्या शासकीय लॅबमध्ये दररोज ३ हजारांहून अधिक सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवली जात असून, खासगी लॅबमध्ये तर जवळपास दीडपट अधिक म्हणजेच ४ हजारांहून अधिक सॅम्पल्सची तपासणी केली जात आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण मार्च महिन्याच्या प्रारंभापासून माेठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात शासकीय लॅबमधून चाचण्यांचा अहवाल मिळण्यास काहीसा विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी अहवाल पाठवत आहेत. शासकीय लॅबमधून मिळणारा अहवाल नि:शुल्क असला तरी खासगी लॅबमधून टेस्टसाठी दिल्या जाणाऱ्या अहवालामागे प्रति सॅम्पल ८५० रुपये शुल्क आकारले जात होते. त्यामुळे कुटुंबातील पाचजणांची टेस्ट खासगी लॅबमध्ये करायची झाली तरी ४ हजारांवर शुल्क लागत होते. त्याऐवजी आता अडीच हजार रुपयात या चाचण्या होणार असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावरचा बोजा काहीसा कमी होऊ शकणार आहे. कोणतीही लक्षणे नसली तरी कुणी संबंधित बाधित आढळल्यास कोरोनाच्या आरटीपीसीआरचे सॅम्पल दिल्यापासून त्याचा अहवाल हाती पडेपर्यंत प्रत्येकाच्या मनावर भीतीचे सावट असते. कोरोनाच्या अहवालाबाबतची ही अनिश्चितता तसेच तणावदेखील अनेकांसाठी असह्य ठरत असल्याने अनेक नागरिक शासकीय लॅबमधून होणारा विलंब टाळण्यासाठी खासगी लॅबमधील अहवालालाच प्राधान्य देत आहेत.
पंधरवड्यात खासगीत ३५ हजार चाचण्या
शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला एकूण आठ ते नऊ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर गत दोन आठवड्यांपासून खासगी लॅबव्दारे सुमारे ३५ हजारांहून अधिक आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. कुटुंबातील सदस्यांना किंवा कार्यालयीन सहकाऱ्यांना लागण झाल्यास खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी खासगी लॅबमधून करुन घेण्याच्या प्रमाणात दिवसागणिक भर पडत आहे.