दिव्यांग, आजारी शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:15 AM2020-02-23T00:15:01+5:302020-02-23T00:28:09+5:30
नाशिकच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीत शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांच्या होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग, दुर्धर आजारी असलेल्या शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक : नाशिकच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीत शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांच्या होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग, दुर्धर आजारी असलेल्या शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षक मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, सचिव नितीन उपासनी, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत विभागातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक नेत्यांसह शिक्षकांनी अरेरावी, दंडाच्या अतिरेकासह मनमानी कारभाराच्या तक्रारींचा पाढा वाचला.
मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मंडळातील लिपिक अरेरावी करतात, धड बोलत नाही अशी तक्रार
केली. यावर आमदार दराडे यांनी त्यांचा समाचार घेतला व तुमचे कारनामे वरपर्यंत मांडण्याची वेळ येऊ देऊ नका,
असे सुनावले. यावेळी शिक्षकांच्या मागणीनुसार केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक यांना उत्तरपत्रिका तपासणी कामातून मुक्त करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. मान्यतावर्धीत व कायम करण्यासाठी दंड रक्कम माफ करून फाईलचा प्रवास शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे न देता थेट विभागीय मंडळात देऊन दंड आकारणी करू नये तसेच २ हजार रुपये आकारून मान्यतावर्धीत व कायम करण्याची सूचना मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी मांडली. हा प्रश्न मंत्रालयातून सोडवण्याचे आश्वासन आमदार दराडे यांनी दिले. पेपर तपासणीचे मानधन वाढवले पाहिजे यावर संघटना अग्रेसर होत्या. मंडळातील लिपिक दिलीप जाधव यांच्याबद्दल तर शिक्षकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. जाधव यांना बैठकीत बोलावण्याच्या सूचना करण्यात आल्यावर त्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. केंद्र देताना आर्थिक व्यवहार होतात, असा आरोप संजय चव्हाण यांनी केला. मागील सभेचे इतिवृत्त न मिळाल्याने शिक्षक सेनेचे संजय चव्हाण चांगलेच भडकले. दिव्यांग शिक्षक, दुर्धर आजाराने त्रस्त शिक्षकांनाही परीक्षा कामातून मुक्त करण्याची सूचना संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, मोहन चकोर, एस. बी. शिरसाठ, भाऊसाहेब सोनवणे यांनी मांडली अन् त्यास सचिवांनी तत्त्वत: मान्यता दिली. यावेळी शिक्षक नेते दिगंबर नारायणे, राजेंद्र सावंत, पुरुषोत्तम खकिबे, बी. के. नागरे, भरत गांगुर्डे, कलीम शेख, एन. वाय. पगार, एम. व्ही. बच्छाव, आर. एस. गायकवाड, राजेंद्र महात्मे, शिवाजी गाडेकर, एम. एन. देशमुख, विजय म्हस्के आदी उपस्थित होते.
धमकावल्याची तक्रार
अनुदानासाठी विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला असताना शिक्षकांना मंडळातून फोन करून धमकावले जाते, अशी तक्रार विभागीय अध्यक्ष कर्तारसिंग ठाकूर यांनी या बैठकीत केली.