नास्तिकांपेक्षाही धर्माचे ठेकेदार अधिक घातक
By admin | Published: January 29, 2017 12:49 AM2017-01-29T00:49:20+5:302017-01-29T00:49:36+5:30
राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश : येवला येथील कार्यक्रमात प्रतिपादन
येवला : नास्तिक लोकांपेक्षाही धर्माचा ठेका घेतलेले धर्मांध ठेकेदार धर्म स्थानात बसून परस्परांची निंदा करत पसरवत असलेला द्वेष हा देखील आतंकवादच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन जैन मुनी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी येवल्यात केले.
येवला मर्चंट को-आॅप. बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात आयोजित प्रवचनात सात हजार किलो मीटरच्या प्रवासात आलेले अनुभव आणि देशहितासाठी सशक्त पिढी कशी घडेल हे सांगताना आतंकवादाचे विविध पैलू त्यांनी आपल्या प्रवचनात स्पष्ट केले. ते म्हणाले, सर्व प्रकारचा द्वेष दूर सारून परस्परांशी प्रेमाने व चांगुलपनाने संवाद साधल्यास मानिसक शांती मिळेलच त्याचबरोबर प्रगतीही साधता येईल. जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या नावावर माणसा-माणसांत द्वेष पसरवणारे लोकच आतंकवादाचे मूळ आहेत. एकमेकाकडे द्वेषाने पाहणारे देखील आतंकवादी असून, दोन दरोडेखोर एकत्र राहू शकतात; परंतु या देशात दोन साधू एकमेकांचा द्वेष करत एकत्र राहू शकत नाही, हि शोकांतिका आहे. असेही कमलमुनी कमलेश यांनी सांगितले. धर्म हा सध्या पोट भरण्याचा धंदा झाला आहे. धार्मिक कट्टरतेने जीव घेतले जात आहेत. विविध धर्माच्या ठेकेदारांनी आपले विचार बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले . गायींवर राजकारण करणारे देखील गोहत्येला जबाबदार असून गोमाता वाचवण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी यावेळी कमलमुनी कमलेश यांनी केली . यावेळी श्रीराम गोशाळा, वैजापूर गोरक्षा समितीचे हिंदू व मुस्लीम समाजातील विविध कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन विजय श्रीश्रीमाळ यांनी केले. प्रवचनासाठी प्रभाकर झळके, संजय मंडलेचा, हर्षल पारख, गुलाबराव पहीलवान , अजय जैन, आनंद शिंदे, सुभाषचंद संचेती, मधुकर घाटकर, बंटी धसे, शेखर सांबर यांच्यासह पुरु ष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.