दंगलीत जात-धर्म नव्हे तर माणूस मरतो : प्रा. सोपान वाटपाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 09:08 PM2018-05-14T21:08:29+5:302018-05-14T21:08:29+5:30
गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले.
नाशिक : स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती-धर्मांना सोबत घेऊन केली त्यामुळे स्वराज्यावर कोणा एकाचा अधिकार नाही. जाती-धर्मावरून दंगली पेटविणे हे स्वराज्यात कधीही घडले नाही; मात्र दुर्दैवाने आज आपल्यासमोर घडत आहे. दंगलींमध्ये कोणताही धर्म किंवा जात मरत नाही तर केवळ माणूस मरतो, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? असा सवाल प्रा. सोपान वाटपाडे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून उपस्थित केला.
गोदाकाठावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे सोमवारी (दि.१४) वाटपाडे यांनी चौदावे पुष्प गुंफले. ‘शिवचरित्र- आधुनिक समस्यांवर शिवचरित्रातून उपाय’ या विषयावर वाटपाडे यांनी उपस्थितांना छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार व संभाजी राजे भोसले यांचा त्याग व समर्पण याविषयी प्रबोधन केले. यावेळी ते म्हणाले, जातीपातीवरील राजकारण आणि दंगे यावर मूळ शोधण्यासाठी समाजाला शिवछत्रपतींचे चरित्र समजून घ्यावे लागणार आहे. त्यांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्याची नव्हे तर शिवरायांचे विचार डोक्यात घालून तशी वागणूक करण्याची वेळ आज आली आहे. छत्रपतींनी सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले हे विसरून चालणार नाही. आज शिवचरित्र व शिवजयंती मनोरंजन आणि धिंगाण्यापलीकडे जात नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत असल्याची खंतही वाटपाडे यांनी बोलताना व्यक्त केली. आजच्या संगणकीय व आधुनिकतेच्या युगात छत्रपती शिवरायांचे महत्त्व तीळमात्रही कमी झालेले नाही. त्यांचे स्वराज्य कोणत्याही जाती, धर्म व पंथाच्या विरोधात कधीही नव्हते, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शिवचरित्रामधून छत्रपतींचे उत्कृष्ट कुशल प्रशासन, व्यवस्थापन, कृषिधोरण, जलनीती, न्यायदान अशा विविध बाबी शिकता येतात.
...तर जिजाऊ जन्माला यायला हव्या
शिवबा जन्माला यावे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्यासाठी आई जिजाऊ जन्माला यायला हव्या; मात्र आजची सुशिक्षित पिढी विज्ञान व तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत गर्भलिंगनिदान चाचण्यांच्या माध्यमातून गर्भातच स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्या नाही तर शिवबा जन्माला कसा येईल? असा प्रश्न वाटपाडे यांनी बोलताना उपस्थित केला. आजच्या युगात मातेचे मातृत्व व प्रेमाशिवाय दुसरे काहीही प्रमााणिक शिल्लक राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मातांनी आपल्या मुळाबाळांवर जिजाऊंसारखे संस्कार के ल्यास प्रत्येक घराघरात शिवबा तयार होईल.